जयपूर : अजगराला कुऱ्हाडीने वार करुन निर्घृणपणे ठार मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानमध्ये उदयपूर जिल्ह्यातील परमदा ग्राम पंचायती अंतर्गत येणाऱ्या भागात हा प्रकार घडला. शेतात आलेल्या अजगराला गावकऱ्यांनी अत्यंत निर्दयीपणे जीवे मारलं. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
शेतात आलेल्या अजगराने आधी एका प्राण्याची शिकार केली होती, त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी कुठलीही दयामाया न दाखवता अजगराची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. विशेष म्हणजे काही जण अजगराला मारत असताना गावातील नागरिकही काहीही न बोलता शांतपणे या प्रकाराचे मूक साक्षीदार झाले. वन्यजीव कायद्याच्या अंतर्गत वन्य प्राण्यांना मारहाण करणे किंवा जीवे ठार मारणे हा गुन्हा आहे. वन विभागाचे पथक संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.
धारावीतील घरात सापडलेला अजगर
दरम्यान, मुंबईतील धारावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाय जंक्शन येथे राहणाऱ्या रहिवाशाच्या घरात वर्षाच्या सुरुवातीला अजगर शिरला होता. पहिल्या मजल्यावर असलेल्या घराच्या कौलात हा सहा फूट लांबीचा अजगर शिरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
अजगर आल्याचं समजताच मुंबई पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस दलात काम करणाऱ्या मुरलीधर जाधव या शिपायाने जीवाची बाजी लावत अजगराची सुटका केली होती. मुरलीधर जाधवांनी अगदी सहजरित्या अजगराला घरातून बाहेर काढलं आणि त्याची सुरक्षित सुटका केली होती. मुरलीधर जाधव यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे पोलीस दलात कौतुक होत आहे.
अजगर घरात शिरल्यामुळे रात्रीच्या वेळी धारावीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अजगराला पकडताच उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. ‘मुंबई पोलीस जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अजगराचे फोटो-व्हिडीओ, मुरलीधर जाधवांना शेकहँड करण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली. मात्र पोलिसांना गर्दीला पांगवलं.
संबंधित बातम्या :
पायाला पीळ मारण्याचा प्रयत्न, वसईत अग्निशमन दलाच्या जवानांकडून साडेसात फुटी अजगराची सुटका
मुंबईतील वांद्रे परिसरात 24 तासात दोन अजगर सापडले!
धारावीतील घरात अजगराची एन्ट्री, जांबाज पोलिस शिपायाकडून थरारक सुटका