लखनऊ : देशात महिला अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. दररोज देशाच्या कुठल्या न कुठल्या काण्याकोपऱ्यातून बलात्काराच्या घटना समोर येताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथील एका नामांकित कॉलेज रुग्णालयात तर प्रचंड धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिला रुग्णाला बाथरुममध्ये घेऊन जात एका आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या नराधमाला रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने रंगेहाथ पकडलं आहे. त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
संबंधित घटना ही अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या जेएन मेडिकल कॉलेजमध्ये उघड झाली आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी हा रुग्णालय प्रशासनाशी संबंधित नाही. तो महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने रुग्णालयात येत होता. पीडित महिला ही गेल्या तीन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे.
पीडित महिलेवर सध्या रुग्णालयातील रिकव्हरी वॉर्डात उपचार सुरु आहेत. या दरम्यान शुक्रवारी (1 ऑक्टोबर) अचानक महिला आपल्या बेडवर दिसली नाही. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या परिचारिकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तिचा पत्ता लागत नव्हता. अखेर ही बातमी संपूर्ण रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली. रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक महिलेचा शोध घेऊ लागले.
यावेळी एक सुरक्षा रक्षक जेव्हा बाथरुममध्ये महिलेचा शोध घेण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण तिथे एक तरुण एका महिलेवर बलात्कार करताना त्याने बघितलं. या प्रकारामुळे सुरक्षा रक्षकाला मोठा धक्का बसला. त्याने वेळेचा विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना आवाज दिला. त्यानंतर त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. तसेच महिलेला डॉक्टर आणि पारिचारिकांच्या स्वाधीन करण्यात आलं.
रुग्णालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्व घटना समजून घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाता पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे. पण अशाप्रकारे एखाद्या रुग्णालयातून महिला रुग्ण गायब होण्यापर्यंत आणि तिच्यावर अत्याचार होईपर्यंत रुग्णालय प्रशासन झोपलं होतं का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
दुसरीकडे, नाशिकमध्ये पवननगर भागात एका व्यावसायिक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. या भागात पीडित महिलेचं ब्यूटी पार्लर आहे. महिला आपल्या पार्लरमध्ये पूजा करत असताना आरोपी तिच्या दुकानात घुसला होता. त्यानंतर आतून दरवाजा लावून आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवला. महिलेच्या तोंडात बोळा कोंबून, तिचे हात बांधून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, नागपुरातही एक अशीच घटना समोर आली होती. 24 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करुन ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बलात्कार पीडितेने आपल्या घरीच स्वत:चा गर्भपात केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
हेही वाचा :
पप्पा देवाघरून येत नाहीत म्हणून देवाघरी जायचा निर्णय; माय-लेकीचा गळफास, चुटपूट लावणारी सुसाईड नोट
आई मुलीला म्हणाली, पाणी येत नाहीय, पाण्याची टाकी बघ, मुलीने झाकन उघडून पाहिलं तर बहिणीचाच मृतदेह