ठाणे : पावसाळा सुरु होताच शेती, जंगलांतील सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे निवारा आणि भक्ष्य शोधण्यासाठी विषारी-बिन साप (Snake) मानवी वस्तीत शिरल्याच्या घटना महिन्याभरापासून घडत आहेत. विशेष म्हणजे एक विषारी कोब्रा (Cobra) नाग माशांच्या जाळ्यात अडकून पडल्याचे मासेमारी करणाऱ्याला दिसताच एकच गोंधळ उडाला होता. मात्र सर्पमित्रांच्या मदतीने जाळे कापून त्या नागाला जीवदान (Rescued) दिले आहे. सर्पमित्रांना याबाबत तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्पमित्रांनी या कोब्राची सुटका करत त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडले.
कल्याण पश्चिमेकडील ग्रामीण भागात मोठमोठी गृहसंकुले, जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यातच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने बिळातून विषारी – बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसापासून वाढल्या आहेत. त्यातच कल्याण पश्चिम परिसरात गोळ्वली गावात मासेमारी करणारे कुटुंब राहत असून त्यांच्या घरासमोरच मासेमारीचे जाळे ठेवले होते. याच जाळ्यात काल रात्रीच्या सुमारास अचानक घरातील एका सदस्याला जाळ्यात कोब्रा नाग दिसला. त्यांनी या विषारी नागाला हुसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र कोब्रा नाग आणखीनच जाळ्यात दडून बसला. त्यानंतर त्यांनी जाळ्यात नाग असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोबे आणि हितेश यांना देण्यात आली. सर्पमित्र दत्ता बेंबे घटनास्थळी पोहचून शिताफीने या कोब्रा नागाला तंगूसचे जाळे ब्लेड व चाकूने कापून नागाला बाहेर काढून पिशवीत बंद केल्याने मासेमारी करणाऱ्या कुटुंबाने सुटकेचा निःश्वास घेतला.
हा विषारी नाग इंडियन कोब्रा जातीचा साप असून साडे चार फूट लांबीचा होता. या नागाला कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्याची परवानगी घेऊन जंगलात निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली. तर दुसरीकडे हवामानात बदल झाल्याने साप भक्ष्य व उब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवी वस्तीत शिरत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे आहे. कुठेही मानवी वस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना याची माहिती तात्काळ देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. (Rescue of cobra snake trapped in fish net in Thane)