इचलकरंजी (कोल्हापूर) : इचलकरंजीत गोविंदराव कॉलेजमध्ये जबर चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्याने कॉलेजच्या तिजोरीतील तब्बल 4 लाख 10 हजार रुपये लंपास केले आहेत. विशेष म्हणजे चोरटा सीसीटीव्हीत चोरी करताना अचूकपणे कैद झाला आहे. कॉलेज परिसरात सीसीटीव्ही लागलेले असताना आरोपीने चोरी करणे हे आश्चर्यकारक आहे. या चोरीच्या घटनेनंतर चोरटाला पोलिसांचा धाकच नाही, असं स्पष्ट होत असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. याशिवाय कोरोना काळात वाहानांच्या चोरीच्या घटना ताज्या असताना कॉलेजमध्ये अशाप्रकारे चोरी झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची आणि भीतीची भावना निर्माण झाली आहे.
इचलकरंजीत शनिवारी (21 ऑगस्ट) मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने ना. बा. एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयासह गोविंदराव हायस्कूल आणि व्यंकटेश महाविद्यालय या इमारतींमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोराने लोखंडी हत्याराचा वापर करुन तिजोरी आणि टेबलचे ड्रॉवर फोडून त्यातील सुमारे 4 लाख 10 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. चोरट्याने चोरी करताना 20 तिजोऱ्या फोडल्या. तसेच इतर कार्यालयीन कामकाजाचे साहित्य देखील विस्कटून टाकले होते.
संबंधित घटना सर्वातआधी आज सकाळी वॉचमनच्या लक्षात आली. त्याने संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर इचलकरंजी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. इचलकरंजी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडसूळ आणि त्यांचे सहकारी-कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची पाहणी केली. यानंतर श्वान पथक आणि फिंगर प्रिंट्स पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यावेळी श्वान पथक हे ना. बा. एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य इमारतीपासून राजवाडा चौक आणि गांधी पुतळा परिसरापर्यंत गेले. बराच वेळ ते याच परिसरात घुटमळत राहिले.
चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याने तीनही इमारतींमध्ये प्रवेश करत लोखंडी हत्याराने तिजोरी फोडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि इतर कामाची जमा झालेली 4 लाख 10 हजारांची रोकड रक्कम लंपास केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. दरम्यान शिक्षण संस्थेतील या धाडसी चोरीच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून शहरात वाहन चोरीबरोबरच अन्य चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता आणि भीतीचे मोठे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.
हेही वाचा :