हिंगोली : जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालीत पोलिसांना सळो की पळो करून सोडलं. येथे चोरी, लूटमार, दरोडा अशा घटनांत मोठी वाढ झाली आहे. पोलिसात तक्रार करुनही अशा घटना कमी झालेल्या नाहीत. पोलिसांना अवैध धंद्यावर अंकुश घालता आलच नाही. मागील दोन तीन महिन्यांपासून जिल्ह्यात चोरट्यांनी हैदोस घालून पोलिसांची झोप उडविली आहे. जिल्ह्यात मागील दोन तीन महिन्यांपासून लूटमार, जबरी चोरी, वाटमारीच्या घटना सतत घडत आहेत. काही दिवसांपूर्वी वसमत येथे बंदुकीचा धाक दाखवून गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याच्या लुटलं होतं. वसमत येथेच शिक्षकांच्या गाडीतील पैसे पळवण्यात आले होते. शेतकऱ्यांची बॅगसुद्धा पळवल्याची घटना घडली होती. याच कारणामुळे शेवटी नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात बंद पुकारला आहे. हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा म्हणून भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते.
काही दिवसांपूर्वी तर हिंगोली शहरात भर दिवसा व्यापाऱ्याला धूम स्टाईलने चोरट्यांनी लुटत लाखोंचा मुद्देमाल पळविला होता. हिंगोली शहरातील उच्चभ्रू वस्तीत भर दिवसा बँक अधिकाऱ्याच्या घरात घुसून अधिकाऱ्याच्या मुलांना बांधून टाकून पत्नीवर चाकू हल्ला केल्याची घटना तर ताजी आहे.
दुसरीकडे कळमनुरी येथील बोल्डा रोडवर एका व्यापाऱ्याची लूटमार करण्यात आली. परवाच्या आठ जानेवारी रोजी दत्तगुरू फार्मच्या मालकाला कळमनुरी हिंगोली मार्गावर अडवून चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाला. त्याच रात्र हिंगोली शहरातील व्यंकटेश्वर हार्डवेअरमध्ये चोरट्याने डल्ला मारला. या सगळ्या चोरीच्या घटनांना कंटाळून या घटनांच्या निषेधार्थ व्यापारी महासंघाने शुक्रवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा घेतला होता.
वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ बंद पुकारल्यानंतरही चोऱ्यांच्या प्रमाणात कोणतीही घट झाली नाही. बंदच्या रात्रीसुद्धा चोरट्यांनी कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे चौघांची घर आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे ऑफिस फोडून पोलिसांच्या नाकी नऊ आणले. शेषराव किसनराव निलकंठे, बाबाराव शंकरराव नीळकंठे, गजानन भारती आणि पांडुरंग बाबाराव निलकंठे यां लोकांचे घर फोडण्यात आले. एवढं कमी म्हणून की काय हिंगोली शहरातील मोंढ्यातील बुद्रुक पाटील या आडत दुकानदाराचे दुकान तोडून चोरी करण्यात आली.
जिथे चोरी किंवा घरफोडीची घटना घडते तिथे पोलीस आणि श्वान पथक पोहोचतात. पण चोरटे काय पोलिसांना सापडत नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर नागरिक आता प्रश्न चिन्ह निर्माण करीत आहेत. शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनानांनी त्रस्त झालेल्या नागरिक आणि व्यापाऱ्यांनी काल संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली होती. तर चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोऱ्या केल्या आहेत. जिल्हाभरात मटका, जुगार, गांजा असे अवैध धंदे सर्रास सुरु आहेत. पण पोलीस यंत्रनेला जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवता येत नाहीयेत. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना विचारले असता तेदेखील काही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत.
इतर बातम्या :
आंबेगावात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करत पडला फडश्या; घटना CCTV मध्ये कैद
Video| पुन्हा अवकाळी तडाखा, शेतकऱ्यांना हुंदके अनावर; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भाला इशारा