मुंबई : साकिनाका बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. तशी माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे आणि सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिलीय. साकीनाक्यातील घटना दुर्दैवी आहे. हा प्रकार निंदनीय आहे. 10 तारखेला 3 वाजून 20 मिनिटांनी खैराणी रोड, साकीनाका इथं ही घटना घडली आहे. आम्हाला कॉल आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी महिला गंभीर अवस्थेत आढळून आली होती, अशी माहिती नगराळे यांनी दिली. (SIT set up to probe Sakinaka rape case, Information of Mumbai CP Hemant Nagarale)
जखमी महिलेला पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर आरोपीविरोधात 307, 376 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मोहन या आरोपीला संशयावरुन ताब्यात घेतलं आहे. तो जोनपूरचा रहिवासी आहे. या आरोपीच्या अंगावर रक्ताचे डाग होते. न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील एक महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू, असा दावाही मुंबई पोलिस आयुक्तांनी केलाय.
उपचारादरम्यान पीडित महिलेचा मृत्यू झालाय. आम्ही सह आरोपीचं कलम 34 लावलं होतं. पण एकच आरोपी असल्याचं उघडकीस आलं आहे. पीडित स्त्री चा जबाब नोंदवता आला नाही. त्यामुळे नक्की काय घडलं हे आताच सांगता येणार नाही. या गुन्हाच्या लवकरात लवकर तपास होईल आणि आम्ही आरोपपत्र दाखल करु, असा विश्वासही यावेळी हेमंत नगराळे आणि नांगरे-पाटील यांनी व्यक्त केलाय.
मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.
याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.
इतर बातम्या :
SIT set up to probe Sakinaka rape case, Information of Mumbai CP Hemant Nagarale