सांगली : बस चालकाने दुचाकी चालकाला साईट न दिल्यानं मारहाणीची घटना समोर आली आहे. एसटी बस चालकाच्या डोक्यात दगड घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इस्लामपूरच्या ताकारी रोडवर ही घटना घडली आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे. मारहाणीत एसटी चालक रामचंद्र मारुती पाटील हे गंभीर जखमी झाले आहे. यामध्ये राजू इनामदार आणि त्याचा साथीदार असलेल्या व्यक्तीवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर बस चालकांच्या सुरक्षेचा आणि वागणुकीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. खरंतर रस्ता अरुंद असल्याने साईट न दिल्याची बाब सांगितली जात आहे. तर दुसरीकडे बस चालक मुद्दामहून साईट देत नसल्याचेही बोलले जात आहे.
इस्लामपुर पोलिस ठाण्यात चालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक रामचंद्र मारुती पाटील हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार केले जात आहे.
सोमवारी दुपारी चालक रामचंद्र पाटील आणि वाहक अजित कुंभार हे महाराष्ट्र राज्य शासनाची बस घेऊन इस्लामपुरातून कडेगाव कडे जात होते. त्याच दरम्यान जात असतांना दुचाकी वर ताकारी येथे राजू आणि त्याचा साथीदार यांनी अडवून जाब विचारण्यास सुरुवात केली.
खरंतर साईट का देत नव्हता म्हणून संशयित राजू आणि त्याचा साथीदार विचारणा करत असतांनाच बाचाबाची झाली. त्यामध्ये राजू याने चालकाच्या डोक्यात दगड उचलून मारला. त्यात चालक रामचंद्र पाटील हे खुर्चीवरच बेशुद्ध पडले होते.
रस्ता तुझ्या बापचा आहे का? म्हणत केलेल्या मारहाणीत चालक रामचंद्र पाटील गंभीर जखमी झाल्याने या घटनेची पंचक्रोशीत जोरदार चर्चा होऊ लागली आहे. खाजगी रुग्णालयात गंभीर जखमी झालेल्या चालकावर उपचार केले जात आहे. तर पोलिस संशयितांचा शोध घेत आहे.