सांगली मिरज येथील रुग्णालयात तोडफोडीची घटना घडली आहे. मिरजेतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश अमनापुरे यांच्या रुग्णालयात दीड वर्षाचे बाळ दगावले. डॉक्टरांनी वेळेत उपचार केले नाहीत म्हणून बाळ दगावल्याच्या रागातून हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी तोडफोड केली. लाखो रुपयांचं वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. तोडफोड मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
2010 मेडिकलनुसार कारवाई करण्याची मागणी डॉ रविकांत पाटील यांनी केली आहे. नातेवाईकांवर मेडिकल एक्ट नुसार कठोर कारवाई करण्याची आयएमएची मागणी आहे. बालरोग तज्ञ डॉ प्रकाश अमानापुरे यांचं मिरज शहरात रुग्णालय आहे. हॉस्पिटलमध्ये रात्री काही लोकांनी जमाव करून डॉ अमनापुरे यांना मारहाण केली तसचं हॉस्पिटलमधील वैद्यकीय साहित्य, मालमत्तेचं तोडफोड करून मोठं नुकसान केलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
उपचारापूर्वीच बाळाचा मृत्यू
नातेवाईकांनी एक वर्षाच्या बालकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणले होते. उपचारापूर्वीच बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी हा प्रकार केल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेचा मिरज इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेच्या डॉक्टरांनी निषेध केला. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे धाव घेतली.
आजोबांची मागणी काय?
दरम्यान डॉ प्रकाश अमनापुरे यांच्या आणि त्यांच्या स्टाफच्या हलगर्जीपणामुळे माझ्या नातीचा मृत्यू झाला. त्यांच्यावर रीतसर करवाई करावी अशी मागणी नबी इलाई मुजावर आणि त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. नबी इलाई मुजावर हे मृत 13 महिन्याच्या जिया हिचे आजोबा आहेत.