मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनीन घडामोडी घडत आहेत. काल संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. आज खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत. आपल्या मुलाला सोडावं. तो निर्दोष आहे असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे. त्या 75 वर्षांच्या आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर अन्याय झालाय असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे. ‘माझ्या मुलाला न्याया द्या’ असं म्हणत त्या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत.
“माझ्या लेकाने काही केलं नाही. माझ्या लेकासाठी मी जीव द्यायला तयार आहे. इथून उठणार नाही” असं पारुबाई कराड टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाल्या. वाल्मिक कराडला 2 कोटींच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर त्या म्हणाल्या की, ‘हे सर्व खोटं आहे’. कोण करतय हे सर्व? त्यावर ‘काय माहित’ असं त्यांनी उत्तर दिलं. जाणीवपूर्वक अडकवल जातय का? या प्रश्नावर ‘आता काय माहित’ असं उत्तर त्यांनी दिलं. तुमचं वय 75 आहे, उपोषण करताय, त्यावर त्या म्हणाल्या की, “माझ्या लेकाला निर्दोष सोडत नाही, तो पर्यंत हलणार नाही. माझ्या लेकाला सोडा, त्याने काही केलं नाही”
वाल्मिक कराडवर अजून मोक्का नाही
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर तो मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय. पण त्याला फक्त 2 कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. अजून त्याला हत्या प्रकरणात आरोपी बनवलेलं नाही. हत्या प्रकरणात अटक झालेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडला हत्या प्रकरणात अटक करुन मोक्का लावावा या मागणीसाठी काल धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावं लागलं.
कोणी कोणाला कसे फोन केले
या प्रकरणात कोणी कोणाला कसे फोन केले, त्याचे सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत. पण पोलीस सर्व गुन्हेगारांना हत्येच्या गुन्ह्यात का आरोपी बनवतं नाहीत, असं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे. त्यांचा सर्व रोख वाल्मिक कराडवर होता. वाल्मिक कराडच्या संपत्तीचे सध्या खुलासे होत आहेत. त्याने कुठे कशी प्रॉपर्टी विकत घेतली, ते पुरावे समोर येत आहेत. वाल्मिक कराड याची धनंजय मुंडेंसोबत मैत्री आहे, या मैत्रीमुळेच त्याला जिल्ह्याच्या राजकारणात बळ मिळालं असा आरोप विरोधकांकडून केला जातो.