पुणे हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडून टोकाचे प्रयत्न झाले. अनेक नियमबाह्य गोष्टी करण्यात आल्या. पैशाच्या जोरावर कायद्याला धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न झाला. पण मीडियाने हे प्रकरण लावून धरल्यामुळे सुदैवाने या सगळ्या गोष्टी उघड झाल्या. अल्पवयीन आरोपीच चक्क ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं. जेणेकरुन, अपघाताच्यावेळी तो दारु पिऊन गाडी चालवत होता, हे सिद्ध होणार नाही. पुण्यातील ससून रुग्णालयात रक्ताचे हे नमुने बदलण्यात आले. या ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी सर्वात मोठी अपडेट आहे. ससूनमधील या ब्लड फेरफार प्रकरणात पोलिसांनी डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हळनोर आणि शिपाई घटकांबळे या तिघांना अटक केली आहे.
आता अटकेत असलेल्या डॉ श्रीहरी हळनोरने मोठी कबुली दिली आहे. त्यामुळे डॉ. अजय तावरेच्या अडचणी वाढणार आहेत. डॉ. श्रीहरी हळनोरवर डॉ. अजय तावरेने दबाव टाकला. डॉ. तावरे व विशाल अग्रवाल यांचं बोलणं झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी डॉ. तावरे यांनी माझ्यावर दबाव टाकला अशी हळनोरने कबुली दिली आहे. रक्त बदलण, माझ्या मनाला ते पटत नव्हत. माझ्याकडून मोठी चूक झाल्याच मला वाटत होतं अशी हळनोरने कबुली दिली आहे. डॉ. श्रीहरी हळनोर सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहे.
बाहेरच्या लोकांनी आत येऊन रक्ताचे नमुने बदलले का?
पुण्याच्या ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीच रक्त बदलण्यात आलं. त्यावेळी मूळ रक्त सॅम्पल कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून देण्यात आलं. पुणे पोलिसांनीच ही माहिती दिली. रक्ताचे नमुने घेण्यासाठी चक्क ससून रुग्णालयात काही खाजगी लोकांनी प्रवेश केल्याची माहिती आहे. ससून रुग्णालयातील नव्हे, तर बाहेरच्या लोकांनी आत येऊन रक्ताचे नमुने बदलल्याच बोलल जातय. ससूनमध्ये संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन कार चालकाचे ब्लड सँपल घेतले होते. मात्र ऐनवेळी आलेल्या खासगी इसमांनी संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकत हे ब्लड सँपल बदलण्यास भाग पाडले. कुणाच्या सांगण्यावरून ते रुग्णालयात आले होते? रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांनी दबाव का टाकला? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेत.