सातारा : कर्नाटकहून महाबळेश्वरला सहलीसाठी आलेल्या बसचा केळघर घाटात ब्रेक फेल झाल्याची घटना आज घडली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र अचनाक घडलेल्या घटनेने विद्यार्थी भयभीत झाले होते. सदर बस कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील संकेश्वर एसडी हायस्कूलची होती. बसमधील सर्व विद्यार्थी सुखरुप आहेत.
कर्नाटक राज्यातील बेळगावहून संकेश्वर एसडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची बस महाबळेश्वर फिरण्यासाठी आली होती. आज महाबळेश्वर येथील पर्यटन स्थळे पाहून महाबळेश्वरहून साताऱ्याच्या दिशेने बस चालली होती.
केळघर घाटातून उतरत असतानाच बसचा अचानक ब्रेक फेल झाला. एसटी चालकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने घाटातील डोंगराच्या बाजूला बस ठोकली.
या बसमध्ये संकेश्वर येथील एसडी हायस्कूलमधील 50हून अधिक विद्यार्थी प्रवास करत होते. अपघातात सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. मात्र या अपघातामुळे विद्यार्थी भयभीत झाले आहेत.
नगर-पुणे महामार्गावर कामरगाव घाटात नगरहून पुण्याकडे चाललेल्या एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनर रस्त्यावर पलटी झाला तर एसटी बस सुदैवाने दरीत कोसळण्यापासून वाचली.
अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून, बसमधील 14 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. नगरहून पुण्याकडे चाललेल्या कंटेनर चालकाचा कामरगाव घाटात उतारावर वाहनावरील ताबा सुटल्याने तो रस्त्यावरच पलटी झाला.
पाठीमागून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आगाराची एसटी बस जात होती. कंटेनर रस्त्यावर उलटल्याने बस चालकही गडबडून गेला आणि त्याने बसचा वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र उतारावर वेग नियंत्रणात आणण्यात त्याला यश आले नाही.