नवी दिल्ली: श्रद्धा हत्याकांडात पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा आला आहे. पोलिसांना एक जबड्याचा भाग सापडला आहे. त्याला काही दातही आहेत. हा जबडा श्रद्धाचाच आहे की नाही माहीत नाही. पण तो कुणाचा आहे याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांनी मुंबईतील डॉक्टरांशीही चर्चा केली आहे. त्याशिवाय दिल्लीच्या एका डेंटल क्लिनिकमध्ये जाऊन पोलिसांनी जबड्याचा फोटो दाखवून डॉक्टरांचं ओपिनियनही घेतलं आहे.
श्रद्धाने मुंबईत दातांवर उपचार घेतले होते. तिने रुट कॅनाल केलं होतं. त्यामुळे तिने ज्या डॉक्टरकडे उपचार घेतले होते, त्यांच्याशीही पोलिसांनी चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. जो जबडा पोलिसांना सापडला आहे, त्यालाही कॅप लावलेलं आहे. त्यामुळेच हा श्रद्धाचा जबडा तर नाही ना? याची खात्री करून घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, आफताबची पॉलिग्राफी टेस्ट करण्यासाठी पोलिसांनी आज साकेत कोर्टात अर्ज दिला आहे. कोर्टाच्या परवानगी नंतरच त्याची पॉलिग्राफी टेस्ट होणार आहे. आतापर्यंत कोर्टाने केवळ नार्को टेस्ट करण्याचीच परवागनी दिली होती.
आफताबला उद्या मंगळवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्याचवेळी त्यांना पॉलिग्राफी टेस्ट करण्याची परवानगी मिळू शकते. एफएसएलच्या माहितीनुसार पॉलिग्राफी टेस्टसठी कोर्टाची वेगळी परवानगी घ्यावी लागते. नार्को आणि पॉलिग्राफी टेस्ट करण्यात जवळपास दहा दिवस लागतात.
पोलिसांना एकूण तीन हाडे सापडली आहेत. त्यातील एक हाड डोक्याच्या खालच्या भागाचं आहे. पोलिसांनी ही हाडे प्रयोगशाळेत पाठवली आहेत. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यावरच ती हाडे श्रद्धाची आहेत की नाही हे समजणार आहे.
दरम्यान, मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबने ज्या दुकानातून करवत, खिळे, हातोडी आणि ब्लेड खरेदी केली होती. त्या हार्डवेअरच्या दुकानात जाऊनही पोलिसांनी विचारपूस केली आहे. मात्र, आफताब या वस्तू खरेदी करण्यासाठी आला होता याबाबतची पुष्टी पोलिसांनी केलेली नाहीये.