VIDEO : अंगावर पावडर टाकला अन् क्षणात बॅग गायब… खुजली गँगची दहशत वाढली; सीसीटीव्हीत काय दिसतंय?

| Updated on: Jul 17, 2024 | 7:36 PM

दिल्लीत पोलिसांनी खुजली गँगचा पर्दाफाश केला आहे. गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या अंगावर पावडर टाकून त्यांच्याकडील वस्तू पळवण्याचं काम हे लोक करत होते. आधी पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारची लूटमार केल्यानंतर ते दिल्लीत सक्रिय झाले होते. विशेष म्हणजे, एक व्हायरल व्हिडीओ पाहून पोलिसांनी स्वत:हून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

VIDEO : अंगावर पावडर टाकला अन् क्षणात बॅग गायब... खुजली गँगची दहशत वाढली; सीसीटीव्हीत काय दिसतंय?
Khujli Gang
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

उत्तर दिल्लीत खुसली गँगची दहशत वाढली आहे. उत्तर दिल्ली पोलिसांनी खुजली गँगच्या दोन सदस्यांना अटक केली आहे. एका व्हायरल व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. खुजली गँगचे सदस्य एखाद्याच्या अंगावर पावडर टाकायचे. त्यामुळे अंगाला खाज आली की व्यक्तीचं लक्ष विचलित व्हायचं आणि हीच संधी साधून ते त्या व्यक्तीच्या वस्तू घेऊन पळून जायचे. त्यामुळे या गँगला सर्वच वैतागले होते. अखेर या गँगचा पर्दाफाश झाला असून दोन जणांना अटक केल्याने या गँगच्या लुटमारीची माहिती मिळणार आहे.

एक व्हिडीओ व्हायरल झाला. दिल्लीच्या सदर बाजार येथील हा व्हिडीओ आहे. पोलिसांनी स्वत: हा व्हिडीओ पाहिला आणि स्वत:हून कारवाई करत दोन जणांच्या मुसक्या आवळल्या. कोणतीही तक्रार आलेली नसताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता या दोन्ही आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

 

गर्दीची ठिकाणे टार्गेटवर

जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणाहून जात असाल आणि अचानक तुमच्या अंगाला खाज सुटली तर सतर्क राहा. तुम्ही पावडर गँगची शिकार होऊ शकता. गर्दीच्या ठिकाणीच खुजली गँग लोकांना ठकवत असल्याचं आढळून आलं आहे. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात एका व्यक्तीच्या अंगावर काही आरोपी पावडर टाकताना दिसत आहेत. पावडर अंगावर पडताच समोरच्या व्यक्तीच्या अंगाला खाज सुटलेली दिसत आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचं लक्ष विचलीत होतं. त्याचाच फायदा घेऊन आरोपी त्याची बॅग घेऊन पळून जाताना दिसत आहेत.

 

दोघेही पश्चिम बंगालचे

हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांकडेही आला. आतापर्यंत पोलिसांना या बाबतची कोणतीच तक्रार मिळालेली नाही. पोलिसांनी स्वत: दखल घेतली. व्हायरल फुटेजच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या आरोपींना शोधून काढले असून आता त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मुन्ना आणि राजेंद्र असं या आरोपींची नावे आहेत. दोघेही पश्चिम बंगालच्या न्यूजलपाईगुडी येथील राहणारे आहेत. पश्चिम बंगालमध्येही त्यांनी अशा प्रकारची लुटमार केल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतही त्यांनी हा प्रकार सुरू ठेवला. दरम्यान, ज्या व्यक्तीच्याबाबत हा प्रकार झाला, त्याने पुढे येऊन तक्रार करावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.