नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्याकांडात अजूनही म्हणावे तसे पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. मात्र, हत्येच्या दिवशी श्रद्धाने तिच्या मित्रांसोबत काही चॅट केली होती. ही चॅट आता समोर आली आहे. या चॅटमधून ती मित्रांशी मनमोकळी गप्पा मारताना दिसत आहे. या जगातील आज आपला शेवटचा दिवस असेल हे तिच्या ध्यानी मनीही नसल्याचं या चॅटमधून दिसून येतं. त्यातून श्रद्धाची मानसिकता समजून येण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
18 मे रोजी श्रद्धाची हत्या झाली. मृत्यूच्या काही तास आधी म्हणजे 4 वाजून 34 मिनिटांनी तिने तिच्या एका मित्राला मेसेज केला होता. तिला माहीतही नव्हतं हा आपला शेवटचा मेसेज असेल. I have Got News… म्हणजे माझ्याकडे एक बातमी आहे, असा मेसेज तिने तिच्या मित्राला केला होता.
त्यानंतर तिने अजून एक मेसेज केला होता. त्यात तिने ती व्यस्त असल्याचं म्हटलं आहे. त्याच दिवशी सायंकाळी 6.29 वाजता तिच्या मित्राने विचारलं काय बातमी आहे. त्यावर श्रद्धाने कोणतंच उत्तर दिलं नाही. त्यानंतर तिच्या मित्राने तिला अनेक मेसेज करून विचारणा केली. पण तिचं काहीच उत्तर आलं नाही.
त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4.35 वाजता मित्राने आफताबला पत्रं लिहिलं. काय झालं अशी त्याला विचारणा केली. तू कुठे आहेस? तुझ्याशी बोलायचं आहे. श्रद्धाला बोलण्यास सांग, अशी विचारणा करण्यात आली. पण आफताबने त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. त्यानंतर या मित्राने संध्याकाळी 5 वाजता आफताबला फोनही केला. पण त्याने उत्तर दिलं नाही.
त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी त्या मित्राने श्रद्धाला मेसेज केला. तू कुठे आहेस? असं विचारलं. तू सुरक्षित आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर श्रद्धा सोबत काही तरी विचित्रं घडलं असावं अशी शंका या मित्राच्या मनात आली. श्रद्धाच्या चॅटमध्ये 24 सप्टेंबर रोजी शेवटचा मेसेज दिसला. पण काहीच उत्तर मिळालं नाही.
दरम्यान, श्रद्धा आणि आफताब दिल्लीत लिव इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. श्रद्धाला आफताबसोबत लग्न करायचं होतं. त्यासाठी तिने त्याच्यामागे तगादा लावला होता. त्यावरून दोघांमध्ये खटके उडायचे. रोज रोजच्या या कटकटीला वैतागून आफताबने तिची हत्या केली. त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाची अनेक ठिकाणी विल्हेवाट लावली.