सिंधुदुर्ग : थोरल्या भावाच्या निधनाच्या धक्क्यातून कसेबसे सावरत असतानाच कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला. पाळीव बैलाने बापलेकावर हल्ला केला. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर लेक गंभीर जखमी झाला आहे. आठवड्याभरात कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषांच्या अकाली निधनाने आधारस्तंभ हरपले. सिंधुदुर्गात घडलेल्या या घटनेमुळे शेट्ये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रांगणा तूळसुली येथे पाळीव बैलाने पिता-पुत्रावर हल्ला केला. यामध्ये विलास शेट्ये या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर मुलाला गंभीर दुखापत झाली आहे.
ओहोळावर बैलाचा पिता पुत्रांवर प्राणघातक हल्ला
आपल्या मालकीच्या पाळीव बैलाला पाणी पाजण्यासाठी ओहोळावर घेऊन गेले असताना बैलाने अचानक या पितापुत्रांवर प्राणघातक हल्ला केला होता. बैलाने इतक्या जोरात धडक दिली की, विलास शेट्ये हे जमिनीवर जोरात आपटले. बैलाने केलेल्या हल्ल्यात विलास यांच्या छाती, हात आणि चेहऱ्यावर गंभीर जखम झाली होती.
धक्कादायक म्हणजे बैलाच्या हल्ल्यानंतर विलास शेट्ये पाण्यात कोसळले. त्यांच्या आसपास बैल जवळपास दोन तास उभा होता. त्यामुळे बराच वेळ ते चिखलातच पडून होते. यामध्ये त्यांना प्राण गमवावे लागले. तर 28 वर्षीय मुलगा प्रमोद शेट्ये याला गंभीर दुखापत झाली आहे.
भावाच्या निधनानंतर आठवड्याभरात धक्का
आठवड्याभरापूर्वीच विलास शेट्ये यांच्या मोठ्या भावाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. आठवड्याभरात एकाच कुटुंबात झालेल्या दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे शेट्ये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संबंधित बातम्या :
मुलाचा वियोग, पत्नी-सासूचा जाच, रडत मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड, 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या
सामूहिक बलात्काराने नाशिक हादरले; वणी येथे 42 वर्षांच्या महिलेवर अत्याचार, 4 संशयितांना बेड्या
स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, विवाहितेने पतीकडून उकळले लाखो रुपये, एका पुराव्यामुळे फुटले बिंग