रांची : मोठी बहीण आईसमान असते, असं म्हणतात. ती आपल्याला खूप जीव लावते. पण झारखंडमधून प्रचंड धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमध्ये मोठ्या बहिणीनेच आपल्या लहान बहिणीला जबरदस्ती देहविक्रीच्या व्यवसायत ढकललं, तिने विरोध केला असता कट रचून तिची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती आता पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे झारखंड पोलीस गेल्या सात महिन्यांपासून तपास करत होते. अखेर तब्बल सात महिन्यांनी पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यात यश आलं आहे. झारखंड पोलिसांनी रविवारी (24 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.
झारखंड पोलिसांना सात महिन्यांपूर्वी मेदिनीनगर परिसरात एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. विशेष म्हणजे या तरुणीचा मृतदेह जमीनीत गाडलेला होता. पण तिचा पाय बाहेर दिसल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी नंतर खोदून तिथून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला होता. या तरुणीच्या मृत्यूमागील गूढ उकलण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतक तरुणीची हत्या तिच्या सख्ख्या बहिणींनी आपल्या पती आणि प्रियकराच्या मदतीने केली होती, अशी माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
झारखंड पोलिसांनी या प्रकरणी मृतक तरुणीची मोठी बहीण राखी देवी (वय 30), रुपा देवी (वय 25), रुपाचा पती धनंजय अग्रवाल उर्फ नन्हकू (वय 30) आणि हमीदगंजला राहणारा आरोपी प्रताप कुमार सिंह उर्फ कारु यांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात नितीश नावाचा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा देखील शोध घेत आहेत. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणाची माहिती दिली आहे. पीडित तरुणीने सुरुवातीला आत्महत्या केली, असा पोलिसांना अंदाज होता. पण मृतदेहावाचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर तपासाचा मार्ग बदलला.
आरोपींनी तरुणीची 21 मार्च 2021 रोजी हत्या केली होती. त्यानंतर त्यांनी तरुणीचा मृतदेह जमिनीत गाडला होता. पण 26 मार्चला मृतदेहाचा पाय काही स्थानिकांना दिसला होता. त्यामुळे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर 30 मार्चला मृतक तरुणीची बहीण रंभा हिने पोलीस ठाणे गाठत आपली ओळख सांगत पीडितेने आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं.
मृतक तरुणीला चार बहिणी आहेत. पाच बहिणींपैकी ती चौथ्या नंबरची बहीण होती. त्यांच्या आई-वडिलांचं निधन झालंय. मृतक तरुणी ही आपली मोठी बहीण राखीच्या घरी राहत होती. राखी ही देहविक्रीचा धंदा करायची. या कामात तिला रुपाचा पती धनंजय सहकार्य करायचा. विशेष म्हणजे राखी आणि धनंजय हे मृतक तरुणीकडून जबरदस्ती देहविक्री व्यावसाय करवून घ्यायचे. तिला तिच्या संमतीशिवाय ग्राहकांकडे पाठवायचे. या दरम्यान तिचं एका तरुणावर प्रेम जडलं होतं. ती त्या तरुणासोबत लग्न करण्यास इच्छूक होती. पण तिची बहीण राखीला ते मान्य नव्हतं.
याच दरम्यान राखीचे दोन प्रियकर आशिक प्रताप आणि नितेश यांची नजर मृतक तरुणीवर पडली. खरंतर हे दोघं राखीच्या घरी येऊन नंगानाच करायचे. ते पीडित तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी इच्छूक होते. राखीने त्यासाठी त्यांना मदत केली. हत्येच्या दोन दिवसांपूर्वी प्रताप राखीच्या घरी पोहोचला. त्यांनी तसा कटच आखला होता. त्या कटानुसार राखी घरात नव्हती. त्याने तेव्हा पीडितेवर अत्याचार केले. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा प्रताप आणि नितीश हे राखीच्या घरी गेले. तेव्हा देखील ठरवलेल्यानुसार राखी घरात नव्हती. त्यांनी पीडितेला एकटं गाठत तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. त्यानंतर त्यांनी पीडितेला गळफास लावत पंख्याला लटकवलं.
राखी जेव्हा घरी आली तेव्हा आपली बहिणीच्या मृत्यू झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने आपली बहीण रुपा आणि तिचा पती धनंजयला घरी बोलावलं. धनंजयने एक टेम्पोवाल्याला फोन करुन बोलावलं. ते पीडितेचा मृतदेह टेम्पोत टाकून हाऊसिंग कॉलनी इथल्या घरी घेऊन गेले. तिथे त्यांनी मृतक तरुणीचे कपडे बदलले. त्यानंतर त्यांनी एका सामसूम जागेत मृतक तरुणीला गाडलं. मृतक तरुणीचं दफन केल्यानंतर आरोपी नितीशने सर्वांना पैसे देऊन रांचीला पाठवलं, असा सगळा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला.
हेही वाचा :
बायकोने अबोला धरल्यामुळे खट्टू, पोलीस कॉन्स्टेबल पतीची विष पिऊन आत्महत्या