सोलापूर : परपुरुषाने पाहू नये म्हणून चक्क पतीने आपल्याच पत्नीचं टक्कल केलं. ही धक्कादायक घटना सोलापूर (Solapur Crime News) जिल्ह्यात घडली. पोलिसांत (Solapur Police) या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलंय. एका 20 वर्षीय विवाहितेसोबत हा संतापजनक प्रकार घडलाय. पत्नीचं टक्कल केल्याच्या 3 महिन्यांनंतर या प्रकरणाला वाचा फोडण्यात आलीय. पीडितेनं आपली व्यथा पोलिसांसमोर मांडल्यानंतर पोलीसही (Husband Wife News) सगळा प्रकार ऐकून अवाक् झाले होते.
सुमैय्या चौधरी असं पीडित पत्नीचं नाव आहे. सुमैय्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळली होती. अखेर वैतागलेल्या सुमैय्या या 20 वर्षीय महिलेनं पोलिसांत धाव घेतली. पोलिसांसमोर सगळा प्रकार सांगितल्यानंतर तिच्या पतीने तिला टक्कल करण्यास भाग का पाडलं याचं कारणंही निदर्शनास आलं. इतर कोणत्याही पुरुषाची नजर आपल्या बायकोवर पडू नये, यासाठी पीडित महिलेच्या पतीने हे धक्कादायक कृत्य केलं होतं.
पीडित सुमैय्या हिचा विवाह जोडबसवण्णा चौकातील कलीम चौधरी या तरुणासोबत झाला होता. मे महिन्यात ते दोघेही विवाह बंधनात अडकले. पण लग्नानंतर सुमैय्याचं आयुष्यच बदलून गेलं.
लग्नानंतर काही दिवसांतच कलीम चौधरी सुमैय्या हिच्यावर संशय घेऊ लागला होता. लग्नानंतर तो तिला सतत त्रास द्यायचा. पतीचा त्रास सुमैय्याने काही काळ सहनदेखील केला. पण अखेर तिची सहनशक्ती संपली आणि तिने थेट पोलिसांत धाव घेतली.
सुमैय्याने पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. तक्रार देण्यात आली. जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये या अजब घटनेप्रकरणी आरोपी पतीविरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय. आता पुढील तपास पोलिसांकडून केला जातो आहे.
पीडित पत्नी सुमैय्या हिची आई सायराबानो फुलारी यांनी म्हटलं की, माझ्या मुलीचं लग्न 13 मे रोजी झालं होतं. दोन महिने सुखात संसार सुरु होता. हसत खेळत सगळं चाललं होतं. दोन महिन्यांनी तिचे सगळे केस काढले. पण तिने काही आम्हाला एका शब्दाने सांगितलं. पैशांचं काय झालं, एवढंच विचारायची आणि तेवढंच बोलून ती फोन ठेवून द्यायची.
तुझे केस चांगले दिसत नाहीत, म्हणत तिचे सगळे केस कापायला लावले होते, असा आरोप पीडितेच्या आईने केलाय. जेव्हा मुलगी घरी आली तेव्हा आम्हाला हे सगळं प्रकरण कळलं, असंही त्यांनी म्हटलंय.