Pune Crime News: पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. त्या वादानंतर संतापलेल्या पत्नीने थेट माहेर गाठले. मग पत्नीला परत आणण्यासाठी पती तिच्या मागे सासूरवाडीत पोहचला. त्यावेळी त्याने पत्नीला तू आताच्या आता घरी चल, असे सांगितले. त्यानंतर पत्नी येत नसल्याने त्याने थेट धमकी दिली. तुझ्या आईचे घर जाळून टाकेल, असे सांगितले. त्यानंतर त्याने घर जाळून टाकले. पुण्यातील कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हनुमंत हाळंदे (२५, रा. भूगाव, ता. मुळशी) याचे तेजल हिच्याशी लग्न झाले आहे. दोन दिवसांपूर्वी साहिल आणि त्याची पत्नी तेजल यांच्यात वाद झाला. त्यामुळे तेजल पुण्यातील कोथरुड भागात तिच्या आईच्या घरी निघून आली. त्यानंतर तिच्या पाठोपाठ साहिल सुतारदरा परिसरातील सासूरवाडीत आला.
साहिल याने तेजलला सांगितले, तू लगेच घरी चल. पाच मिनिटांत तू आली नाही, तर तुझ्या आईचे घर जाळून टाकेन, अशी धमकी दिली. त्यानंतर साहिलने घरात घुसून शिवीगाळ करत ज्वलनशील पदार्थ टाकून घराला आग लावली. आग लागल्यानंतर शेजारील लोकांनी अग्निशमन दलास फोन केला. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि शेजारच्या लोकांनी मिळून आग विझवली. या आगीमध्ये त्यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तु, कपाटे, कपडे, गाद्या, भांडी, टीव्ही व इतर सर्व घरातील वस्तू अर्धवट जळून नुकसान झाले आहे.
या प्रकरणी सासू कविता फेंगसे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पसार झालेल्या साहिल हाळंदे याला अटक केली आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी भेट दिली.
साहिल हा कोणत्यातरी मुलीसोबत फिरतो असतो, असा आरोप तेजलने केला. त्यामुळे तेजल व साहील यांचे भांडण झाले आहे. त्यामुले तेजल सात महिन्यांच्या बाळाला घेऊन माहेरी निघून आली.