टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणसोबत खेळलेल्या एका खेळाडूची हत्या झालीय. धम्मिका निरोशना या खेळाडूच नाव आहे. मंगळवारी रात्री त्याची हत्या झाली. गुन्हेगारांनी घरात घुसून धम्मिका निरोशनाला पत्नी आणि मुलांसमोर गोळी झाडली. धम्मिका निरोशना हा श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आहे. धम्मिका निरोशना श्रीलंकेच्या अडंर-19 टीमचा कॅप्टन होता. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. धम्मिका निरोशना अंडर 19 च्या दिवसात इरफान पठाण, पार्थिव पटेल या भारतीय क्रिकेटपटूंसोबत खेळलाय.
धम्मिका निरोशनाची हत्या कोणी केली? याचा श्रीलंकन पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना अजूनपर्यंत गुन्ह्यामागचा उद्देश समजलेला नाही. धम्मिका निरोशनाची हत्या झाली, त्यावेळी घरात पत्नी आणि मुलं होती. धम्मिका निरोशना गॉलच्या अम्बालनगोडा येथे रहायचा.
धम्मिका निरोशनाच क्रिकेट करियर
धम्मिका निरोशना श्रीलंकेच्या अंडर 19 टीमकडून क्रिकेट खेळला. पण तो कधी श्रीलंकेच्या सिनियर संघात स्थान मिळवू शकला नाही. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आणि लोअर ऑर्डरचा बॅट्समन होता. 2001 ते 2004 दरम्यान गॉल क्रिकेट क्लबसाठी 12 फर्स्ट क्लास मॅच आणि 8 लिस्ट ए सामने खेळलाय.
हे स्टार खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली खेळले
धम्मिका निरोशनेने श्रीलंकेच्या अंडर 19 टीममध्ये वर्ष 2000 मध्ये डेब्यु केला. 2 वर्ष तो श्रीलंकेच्या अडंर 19 टीमसाठी खेळला. या दरम्यान त्याने 10 सामन्यात कर्णधारपद भूषवलं. एंजलो मॅथ्यूज, उपल थरंगा हे श्रीलंकेचे मोठे स्टार खेळाडू अंडर 19 च्या दिवसात धम्मिकाच्या कॅप्टनशिपमध्ये खेळले आहेत. धम्मिका निरोशनाने डिसेंबर 2004 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
भारताविरुद्धच्या सामन्यात त्याचं प्रदर्शन कसं होतं?
इरफान पठान, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, मनविंदर बिस्ला हे खेळाडू असलेल्या भारताच्या अंडर 19 टीम विरोधातही धम्मिका निरोशना खेळलाय. वर्ष 2002 मध्ये भारताविरुद्धच्या या सामन्यात धम्मिका निरोशनाने श्रीलंकेच्या अंडर 19 टीमच नेतृत्व केलं होतं. या मॅचमध्ये धम्मिका खात उघडू शकला नव्हता तसच त्याला एक विकेटही मिळाली नव्हती. भारताने तो सामना 6 विकेट्सने जिंकलेला.