नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी उसतोडीला गेलेल्या ऊसतोड कामगाराच्या बैलगाडीला महामंडळाच्या भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील मायलेक जागीच ठार झाले तर वडील आणि मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाले आहे.या घटनेत बैलगाडीचा चुराडा झाला असून एक बैल देखील ठार झाला आहे..ही घटना औरंगाबाद-पुणे महामार्गावरील इसारवाडी फाट्याजवळ घडली. या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माणिकपुंज येथील ऊसतोड कामगार गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे, सोन्याबाई गोविंद गिरे व अर्जुन गोविंद गिरे असे एकाच कुटुंबातील चार जण बैलगाडीतून औरंगाबाद-पुणे महामार्गाने जात होते. त्यांची बैलगाडी ईसारवाडी फाट्याजवळील इंडियन ढाब्यापासून महामार्ग ओलांडत होती. त्याचवेळी नाशिककडून-औरंगाबादकडे जाणारी एस.टी.महामंडळाच्या बसने बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातात बैलगाडी मधील सोन्याबाई गोविंद गिरे व अर्जुन गोविंद गिरे हे दोघे मायलेक असे दोन जण जागीच ठार झाले आहेत.
तर सोन्याबाई यांचे पती गोविंद गिरे व मुलगा बाळू गोविंद गिरे हे जखमी झाले आहे.यातील एकाची प्रकृती मात्र चिंताजनक आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या धडकेत बैलगाडीचा संपूर्ण चुराडा होऊन बैलगाडीच्या दोन बैलांपैकी एक बैल जागीच ठार झाला. तर दुसरा बैल देखील जखमी झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस अपघातस्थळी दाखल झाले होते त्यांनी जखमींना उपचारासाठी गंगापूर व औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले होते.
ऊसतोड कामगार असलेल्या माय – लेकाचा मृत्यू झाल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
राज्य सरकारने ही घटना गांभीर्याने घ्यावी तसेच स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत ऊसतोड कामगारांसाठी व्यापक अपघात व आरोग्य विमा योजना सुरू करावी अशी मागणी देखील केली आहे.