Stone pelting on Vande Bharat train: भारतातील सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत सर्वाधिक लोकप्रिय गाडी ठरत आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास होत असल्यामुळे अनेक जण वंदे भारतमधून प्रवास करण्यास प्राधान्य देतात. या गाडीवर दगडफेकीच्या घटना अधूनमधून होत असतात. आता उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाली. त्या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (एटीएस)कडून सुरु आहे. या प्रकरणी हुसैन उर्फ शाहिद या आरोपीला एटीएसने अटक केली. त्याने ट्रेनच्या खिडक्या तोडण्याबरोबर ट्रेनचा वेग कमी करण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचे सांगितले. त्यामुळे खिडक्यांजवळ बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरता येणे शक्य होईल.
2 ऑक्टोंबर 2024 रोजी वाराणसीवरुन दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाली होती. कानपूरजवळील पनकी स्टेशनजवळ दगडफेक झाली होती. त्यामुळे या ट्रेनच्या C7 खिडकीचे काच तुटले होते. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे प्रवाशी घाबरले होते. अनेक जण घाबरुन सीटाच्या खाली वाकले. या प्रकरणाची माहिती आरपीएफ आणि जीआरपीला देण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तपासासाठी एटीएस पथकाची नियुक्ती करण्यात आली.
वाराणसीमधील एटीएसकडून या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. या प्रकरणात हुसैन उर्फ शाहिद याला अटक करण्यात आली. त्याची एटीएसने कसून चौकशी सुरु केली. त्यात त्याने सांगितले की, ट्रेनचा वेग कमी करणे हा आपला उद्देश होता. त्यामुळे या ट्रेनमध्ये खिडकीशेजारी बसलेल्या लोकांचे मोबाईल लंपास करता येतील. या उत्तराने एसटीएस पथकालाही धक्का बसला.
वंदे भारत ट्रेनवर दगडफेक केल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. कानपूर, इटावा येथेही या घटना घडल्या आहेत. वारंवार होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमुळे रेल्वे सुरक्षा दलापुढे आव्हान निर्माण झाले आहे. या घटनांनंतर रेल्वे प्रशासनाकडून वंदे भारतच्या मार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आरपीएफ आणि जीआरपीची संयुक्त टीम देखरेख करत आहेत.