जितेंद्र पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पालघर : एमबीबीएसच्या परीक्षेत पास व्हायचं असेल तर मला हवं ते दे असं सांगून विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघरच्या डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वेदांत मेडिकल कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमधील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कुंपनाकडूनच शेत खाल्लं जात असेल तर इतरांनी जायचं कुठं? कुणावर भरवसा ठेवायचा? असा सवाल केला जात आहे. तसेच विकृत प्राचार्याला अटक करून त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणीही केली जात आहे.
यापूर्वी देखील प्राचार्याने अशाच पद्धतीने या तरुणीची फोनवरून आणि प्रत्यक्ष छेड काढली आहे. यासंदर्भात या पीडित विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या प्रशासनाला लेखी तक्रार देखील केली होती. मात्र तरी देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती पीडित विद्यार्थिनीने आपल्या फिर्यादीत दिली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 च्या 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. फिर्याद देणारी 21 वर्षीय विद्यार्थिनी ही मूळची नागपूर येथील असून ती डहाणूतील वेदांत वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच शिक्षण घेते.
या सगळ्या घटनेनंतर डहाणूच्या वेदांत वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धुंदलवाडी सारख्या ग्रामीण भागातील वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असतात. मात्र प्राचार्यांकडून केल्या जाणाऱ्या अशा प्रकारांमुळे विद्यार्थिनींच्या तसेच या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे येथील पोलीस प्रशासनासह रुग्णालय व्यवस्थापन आता काय कारवाई करत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, या तरुणीने या आधीही प्राचार्याविरोधात प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतरही महाविद्यालय प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. एवढ्या गंभीर प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष कसं करू शकतं? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. तसेच प्रशासनाने काहीच पावलं उचलली नसल्यामुळेच प्राचार्याची पुन्हा या विद्यार्थीनीची छेड काढण्याची हिंमत झाली. प्राचार्यावर कारवाई झाली असती तर त्याची ही हिंमत झालीच नसती असं पालकांचं म्हणणं आहे. या प्राचार्याने आणखी काही विद्यार्थींनीना असाच त्रास दिला आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही पालकांनी केली आहे.