राष्ट्रपती भवन, ताजमहल ते आयफेल टॉवर विकले… जगातील या महाठकांच्या करामती माहीत आहे काय?

| Updated on: Nov 15, 2024 | 6:24 PM

जगातील पाच अतिशय चतूर गुन्हेगारांच्या धक्कादायक कहाण्या समोर आल्या आहेत. चार्ल्स शोभराज, नटवरलाल, ठग बहराम, जॉर्ज सी. पार्कर आणि विक्टर लस्टिग यांनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी केला. त्यांच्या योजना आणि कौशल्यामुळे पोलिसांनाही अडचणींचा सामना करावा लागला. या लेखातून त्यांचे गुन्हेगारी कारनामे आणि त्यांच्या पकडण्याच्या कथा समजतील.

राष्ट्रपती भवन, ताजमहल ते आयफेल टॉवर विकले... जगातील या महाठकांच्या करामती माहीत आहे काय?
charles sobhraj
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

माणसाचा काहीच थांगपत्ता लागत नाही. प्रत्येकाची वेगळी बुद्धिमत्ता असते. काही लोक अत्यंत ढ असतात. तर काही लोक संगणकापेक्षाही सुपरफास्ट बुद्धीचे असतात. पण हेच लोक गुन्हेगारी जगतात असतील तर? तर मग बघायलाच नको. जगात असे पाच महाठक होऊन गेले. त्यांची बुद्धीमत्ता प्रचंड सुपरफास्ट होती. त्यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज होतं. पण त्यांनी आपली बुद्धीमत्ता गुन्हेगारी कार्यासाठी वापरली. त्यामुळे पोलिसांना त्यांना पकडताना नाकीनऊ आले होते. या महाठकांनी राष्ट्रपतीभवन, ताजमहपासून ते आयफेल टॉवरही विकला होता. त्यांच्या कहाण्या वाचून तुम्हीही थक्क व्हाल. इतक्या त्या रंजक आहेत.

चार्ल्स शोभराज

सुमारे दोन वर्षापूर्वी मै और चार्ल्स हा सिनेमा आला. त्यात रणदीप हुड्डाने भूमिका केली होती. अमिताभ बच्चन यांच्या डॉन या सिनेमातील “डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है” हा संवाद चार्ल्स शोभराजच्या वैयक्तिक आयुष्यातून घेण्यात आल्याचा दावा रणदीपने केला होता. चार्ल्सचा जन्म व्हिएतनाममध्ये झाला होता. तो अपराध जगतातील एक दंतकथा आहे. त्याचे वडील भारतीय होते. चार्ल्सवर भारतासह थायलंड, नेपाळ, तुर्की आणि ईराणमध्ये हत्येचे 20 गुन्हे दाखल आहेत.

त्याला सीरिअल किलर, बिकीनी किलर म्हटलं जातं. 2004मध्ये त्याला पहिल्यांदाच एखाद्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. तो वेषांतर करण्यात पटाईत आहे. महिलांना टार्गेट करणं ही त्याची खासियत. त्यामुळे त्याला द सर्पेंट आणि बिकनी किलरही म्हटलं गेलं. कोणत्याही आरोपात तुरुंगात गेल्यानंतर त्याच्या मर्जीने तो तुरुंगातून पलायन करायचा. लाच देऊन तो तुरुंगात पाहिजे त्या सुविधा मिळवत असायचा. ड्रग्स तस्करी हा त्याचा मुख्य व्यवसाय होता. तो स्वत:चा खटला स्वत:च लढवायचा. त्याची बुद्धी अत्यंत तल्लख होती, पण गुन्ह्यांसाठी तो आपल्या बुद्धीचा वापर करायचा.

नटवरलाल

नटवरलालचं खरं नाव मिथिलेश कुमार श्रीवास्तव होतं. भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ठगसेन म्हणून त्याची ओळख आहे. त्याने लोकांना मूर्ख बनवून दिल्लीचा लाल किल्ला, संसद भवन आणि ताजमहल सुद्धा विकला होता. त्या बदल्यात लोकांकडून कोट्यवधी रुपये त्याने उकळले आहेत. पोलिसांनी त्याला आठवेळा अटक केली. पण आठही वेळा तो फरार झाला.

नटरवलालवर बॉलिवूडमध्ये असंख्य सिनेमे बनले आहेत. त्याने भारताचं राष्ट्रपती भवनही विकलं होतं. त्याने कागदपत्रांवर राष्ट्रपतींच्या बनावट सह्याही केल्या होत्या. सुरुवातीला त्याने वकील म्हणून नोकरी केली होती. त्यामुळे त्याला कायद्याच्या सर्व पळवाटा माहीत होत्या.

ठग बहराम

अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात ठग बहराम प्रसिद्ध होता. त्याने 900 हून अधिक हत्या केल्याचं सांगितलं जातं. 1765मद्ये त्याचा जन्म जाला. 1840मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पिवळ्या रुमालासाठीही तो प्रसिद्ध होता. त्याच्या टोळीत किमान 200 लोक होते. एक लोक एकत्र जायचे आणि सर्वांचीच हत्या करून लूट करायचे. त्याचं नाव गिनीज बुकातही नोंदलं गेलंय. इंग्रजांसाठी तर बहराम म्हणजे डोकेदुखी होता. त्याला पकडण्यासाठी इंग्रजांनी 10 वर्ष जंग जंग पछाडले होते.

जॉर्ज सी पार्कर

जॉर्ज सी पार्कर हा जगातील सर्वात मोठा ठग होता. लोकांना बोलता बोलता ते फसवायचा. बोलता बोलता त्याने अमेरिकेतील प्रसिद्ध इमारती, चौक विकून पैसे घेऊन फरार झाला होता. त्याने न्यूयॉर्कमध्ये मेडिसीन स्क्वॉयर गार्डन, मेट्रोपॉलिटिन आर्ट म्युझियम, ग्रँट यांचा मकबरा आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचाही सौदा केला होता. यातील सर्वात मोठा सौदा हा ब्रुकलिन ब्रिजचा होता. त्याने हा ब्रिज अनेकवेळा विकला होता.

विक्टर लस्टिग

1890मध्ये चेकोस्लोव्हाकिया येथे व्हिक्टरचा जन्म झाला. तो जन्मापासूनच शातिर डोक्याचा होता. त्याला अनेक भाषा येत होत्या. पठ्ठ्याने चक्क आयफेल टॉवर विकला होता. 1925 मध्ये त्याने एका वृत्तपत्रात आयफेल टॉवरच्या दुरुस्तीची बातमी वाचली. त्यानंतर सरकारी अधिकारी बनून त्याने सहा मोठ्या भंगार व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. त्याने यातील एका भंगार व्यापाऱ्याला आयफेल टॉवर विकला. हा टॉवर ट्रेनने ऑस्ट्रियात घेऊन येण्याच्या अटीवर त्याने हा टॉवर विकला. व्हिक्टरने आपल्या बोलण्यात फसवून फ्रान्सचा त्यावेळचा सर्वात मोठा गँगस्टर अल कॉपोनलाही फसवलं होतं. त्याने अल कॉपोनला स्टॉकमध्ये 40 हजार डॉलर गुंतवायला भाग पाडलं होतं.