रांची : झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील एका गावातून संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेम संबंधांच्या संशयातून गावातील 50 ते 60 जणांच्या जमावाने एक महिला आणि तरुणाला प्रचंड मानसिक आणि शारीरिकरित्या छळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे गावातील तरुणांनी आधी पीडितांना खोलीत डांबून ठेवलं. त्यानंतर महिला आणि तरुणाला निर्वस्त्र करत गावात आणि गावाबाहेर एक किमीपर्यंत फिरवत नेलं. काही नराधमांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करत त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही केला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तसेच 50-60 अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित घटना ही दुमका जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस ठाणे हद्दीत घडली. पीडित महिला आपल्या तीन लहान मुलांसह गावात राहते. संबंधित गाव हे तिचं सासर आहे. महिलेचा पती हा गेल्या वर्षभरापासून दुमका जेलमध्ये कारावासाची शिक्षा भोगतोय. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी ही महिलेवर आहे. महिला मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.
मजुरीचं काम करत असताना महिलेची एका तरुणासोबत ओळख झाली. संबंधित तरुणाचं देखील लग्न झालेलं असून त्याला दोन लाहन मुलं आहेत. हा तरुण सोमवारी संध्याकाळी (27 सप्टेंबर) पीडित महिलेच्या घरी तिला भेटण्यासाठी आला. यावेळी गावातील चार-पाच तरुणांनी त्यांना पकडलं. त्यांनी पीडितांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यावेळी गावातील आणखी 50 ते 60 जणांचा जमाव गोळा झाला. जमलेल्यांनी महिला आणि तरुणाला छळायला सुरुवात केली. त्यांनी महिला आणि तरुणाच्या अंगावरील कपडे फाडत त्यांना निर्वस्त्र केलं. त्यानंतर त्यांना गावातून फिरवत गावाबाहेर चालत नेलं.
या दरम्यान शेजारील गावच्या नागरिकांनी जेव्हा कृत्य बघितलं तेव्हा त्यांनी या कृत्यावर विरोध दर्शवला. तसेच दुमका मुफस्सिल पोलीस ठाण्यात एकाचा फोन गेला. त्याने संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस त्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडितांना जमावातून सुरक्षित बाहेर काढलं. त्यानंतर सोमवारी रात्री पीडितांनी पोलीस ठाण्यात आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली. पोलिसांनी त्यांना आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं.
या घटनेप्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे. पीडितांनी न्यायाची मागणी केलीय. याशिवाय या घटेनची स्थानिक मीडियापासून राष्ट्रीय स्तरावरच्या माध्यमांनी दखल घेतली आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला आहे. पीडितांवर खूप मोठा अत्याचार झाला आहे. त्यांना योग्य न्याय मिळणं जरुरी आहे. तसेच आरोपींना मोकाट सोडता कामा नये. त्यांना योग्य शिक्षा व्हायलाच हवी, जेणेकरुन पुन्हा तशा घटनेती पुनरावृत्ती होणार नाही. पोलिसांनी आतापर्यंत या घटनेप्रकरणी चौघांना अटक केली आहे. तसेच 50-60 अज्ञातांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. ते सर्व आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच या घटनेमुळे संपूर्ण झारखंड राज्य हादरलं आहे.
हेही वाचा :