चेन्नई : रावणाच्या कैदेत राहिलेल्या सीतामाईच्या पावित्र्यावर शंका उपस्थित झाल्याने साक्षात प्रभू रामचंद्रांनी त्यांची अग्निपरीक्षा घेतल्याची पौराणिक कथा आपण ऐकलेली आहे. मात्र आजच्या काळातही विवाहितेला आपण एकनिष्ठ असल्याचं अघोरी प्रकारांद्वारे सिद्ध करावं लागत असल्याचं समोर आलं आहे. दुर्दैवी म्हणजे या घटनेत 10 वर्षांच्या बालिकेला जीव गमवावा (Daughter Murder) लागला. तामिळनाडूतील तिरुवोट्टीयुर (Thiruvottiyur) भागात रविवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चारित्र्य स्वच्छ असल्याचं सिद्ध करण्यासाठी पतीने पत्नीला तिच्या दहा वर्षांच्या मुलीला पेटवण्यास सांगितलं. तू माझ्याशी एकनिष्ठ असशील तर या आगीचा तुझ्या लेकीवर काहीही परिणाम होणार नाही, असं नराधम नवरा म्हणाला. बायकोनेही आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी पोटच्या मुलीला आगीच्या भक्ष्यस्थानी टाकलं, मात्र या अघोरी प्रकाराने बालिकेचा जीव गेला. विशेष म्हणजे पत्नीला हे कृत्य करायला लावणारा आरोपी तिचा तिसरा नवरा आहे, तर मयत मुलगी महिलेला तिच्या दुसऱ्या नवऱ्यापासून झाली होती. हा दुसरा नवरा म्हणजे तिच्या पहिल्या पतीचा धाकटा भाऊ.
आपल्या मुलीला जाळणाऱ्या महिलेला चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे. पतीने तिच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केल्यामुळे आपलं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी तिने 10 वर्षांच्या मुलीला जिवंत जाळल्याचा आरोप आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
10 वर्षांची पवित्रा इयत्ता पाचवीत शिकत होती. ती तिची आई जयलक्ष्मी (38), सावत्र वडील पद्मनाभन आणि दोन सावत्र बहिणींसोबत राहात होती. रविवारी रात्री आईने पेटवल्यानंतर ती 75 टक्के भाजली होती, त्यानंतर सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी जयलक्ष्मी आणि तिचा तिसरा पती पद्मनाभन यांना ताब्यात घेतले. नंतर न्यायालयाने त्यांची तुरुंगात रवानगी केली.
पोलिसांनी सांगितले की, जयलक्ष्मी 19 वर्षांची असताना पलवन्नन यांच्याशी तिचा पहिला विवाह झाला होता. दोघांना एक मुलगी असून ती नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. ती तुतीकोरीन येथे तिच्या आजीसोबत राहते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जयलक्ष्मीने पलवन्ननला सोडले आणि त्याचा धाकटा भाऊ दुराईराजशी लग्न केले. दोघे मुंबईत राहत होते, तिथेच पवित्राचा जन्म झाला.
जयलक्ष्मी नंतर दुराईराजला सोडून चेन्नईला परतली. ती तिरुवोट्टीयुर येथे स्थायिक झाली. तिथे तिची पद्मनाभनशी मैत्री झाली. पद्मनाभन घटस्फोटित असून टँकर चालक आहे. या दोघांचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना सहा आणि चार वर्षांची दोन मुले आहेत.
पद्मनाभन अनेकदा मद्यधुंद होऊन जयलक्ष्मीशी भांडत असे, आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. रविवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि पद्मनाभनने तिला थेट पवित्राला जिवंत जाळण्याचे चॅलेंज दिले. तू निर्दोष असशील तर ही आग तुझ्या मुलीला कुठलीही इजा करणार नाही, असंही तो म्हणाल्याचा दावा केला जात आहे.
जयलक्ष्मी आतल्या खोलीत गेली. सावत्र बहिणींसोबत झोपलेल्या पवित्राला तिने ओढत बाहेर नेले, आणि अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेत आग विझवली आणि मुलीला रुग्णालयात नेले, मात्र भाजल्याने तिथे तिचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या :
परजातीच्या प्रियकरामुळे अल्पवयीन मुलगी प्रेग्नंट, आईला संताप अनावर, मुलाच्या मदतीने लेकीचा जीव घेतला
पत्नीने सोनोग्राफीसाठी पैसे मागितले, नवऱ्याकडून लेकीची हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न
प्रेम विवाहाचा राग, पित्याकडून पोटच्या मुलीची बलात्कार करुन हत्या, आता जावयाने आयुष्य संपवलं