अकोला हादरलं, शिक्षकाने शाळेतच 6 मुलींचा केला विनयभंग, अश्लील व्हिडिओ दाखवत छळ

| Updated on: Aug 21, 2024 | 4:13 PM

महाराष्ट्रात मुली आता खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य म्हणून ओळखलं जातं. पण याच महाराष्ट्रातील मुलींसाठी शाळा कितपित सुरक्षित आहेत? हा गंभीर प्रश्न आहे. बदलापुरातील संतापजनक घटना ताजी असताना आता अकोल्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाचा चीड आणणारा प्रताप समोर आला आहे. त्यामुळे या विकृत मानसिकतेचं काय करायचं? त्यांची अशी कृत्य फोफावू नये म्हणून त्यांना कठोरात कठोर काही कारवाई केली जाणार आहे की नाही? विशेष म्हणजे असे प्रकार कितीवेळा महाराष्ट्राच्या लेकींनी सहन करायचे? असे प्रश्न आता महाराष्ट्रातील जनसामान्यांमधून उपस्थित होत आहेत.

अकोला हादरलं, शिक्षकाने शाळेतच 6 मुलींचा केला विनयभंग, अश्लील व्हिडिओ दाखवत छळ
Follow us on

बदलापुरातील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना आता अकोल्यात पुन्हा एकदा अतिशय संतापजनक घटना घडली आहे. अकोल्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे. शिक्षकांना आपण गुरु मानतो. शिक्षकांना आपण देवाचा दर्जा देतो. पण अकोल्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे. विकृत शिक्षकाने शाळेतील 6 विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ दाखवत विनयभंग केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शाळा, ज्ञान मंदिरात मुली शिक्षण घेण्यासाठी जातात. पण आता अशा ज्ञान मंदिरातच मुली सुरक्षित नसल्याचं समोर येत आहे. शिक्षकच विद्यार्थिनींचा विनयभंग करत असेल तर त्यांच्याकडून विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्याची आशा कशी करायची? आता हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालयांमध्येच मुली सुरक्षित नसल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुलींना सुरक्षित वातावरण कसं निर्माण होईल? असा प्रश्न उपस्थित होतोय.

नेमकं प्रकरण काय?

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे पडसाद राज्यभर उमटले असतानाच, तसाच संतापजनक प्रकार अकोला जिल्ह्यात घडला आहे. अकोल्यात शिक्षकाने सहा विद्यार्थिंनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार हा एका शाळेतील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडला आहे. जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिंनीचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ही घटना मंगळवारी (20 ऑगस्ट) संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकाराने जिल्हाभरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तर या प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. अकोल्यातील शिक्षकावर कठोर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

ठाकरे गटाचे आमदार पोहोचले संबंधित शाळेत

बाळापूर मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे संबंधित शाळेत गेले. “हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं गेलं पाहिजे. हे प्रकरण अंडर टेकिंगमध्ये राहिल पाहिजे. तसेच आरोपी शिक्षकाला सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे”, अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली. दरम्यान, नितीश देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “महिलांना 1500 रुपये देण्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि सर्व शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावा. असा मुख्यमंत्री मी पाहला नाही.जो मुलींसाठी आंदोलन करणाऱ्या लोकांना राजकीय प्रेरित आंदोलन म्हणेल”, अशी टीका नितीन देशमुख यांनी केली.

अंबादास दानवे यांच्याकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अकोला आणि बदलापूरच्या घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “लाडक्या बहिणींच्या लेकीने किती छळ सोसायचा? बदलापूर पाठोपाठ अकोल्यातील एका गावात एका शिक्षकावर 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. कायद्याचा धाक उरला आहे का या राज्यात? सरकारने ‘फडतूस’गिरी बंद करा, राजीनामा द्या”, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.