नाशिक : बहुचर्चित अंजनेरी येथील आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षीय बालकाचा खून झाला होता. या खुनाच्या गुन्ह्याचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. मात्र, खुनाचा गुन्हा उलगडत असतांना समोर आलेल्या बाबीने खळबळ उडाली आहे. आधारतीर्थआश्रमातील 13 वर्षीय मुलालाच याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी आधारतीर्थ आश्रमातील अलोक शिंगारे या चार वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलिसांसमोर मोठं आवाहन निर्माण झाले होते. ठोस पुरावे मिळत नसल्याने खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा होत नव्हता, मात्र गुरुवारी रात्री उशिरा गुन्ह्याची उकल करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
मंगळवारी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील अंजनेरी शिवरातील आधारतीर्थ आश्रमात सकाळी सहा वाजेच्या दरम्यान चार वर्षीय अलोक शिंगारे या बालकाचा मृतदेह आढळून आला होता.
या प्रकरणी त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वर येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आला होता, त्याच दरम्यान त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा संशय निर्माण झाला होता.
शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली होती, त्यामध्ये आधारतीर्थ आश्रमाबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चार वर्षीय बालकाचा खून आश्रमातील 13 वर्षीय मुलाने केला असून पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे, त्यामध्ये त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
130 हून अधिक मुलं-मुली आधारतीर्थ आश्रमात राहतात, शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि गोर-गरीब कुटुंबातील मुलांसाठी हे आधारतीर्थ आश्रम संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहे.
त्र्यंबकेश्वर रोडच्या कडेलाच असल्याने अनेक बडे नेते, सेलिब्रेटी येथे येऊन फंड देऊन जातात, पण नेहमीच तक्रारीमुळे आधारतीर्थ आश्रम चर्चेत असतं, त्यामुळे या आधारतीर्थ आश्रमाची देखील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, चार वर्षीय बालक अलोक शिंगारे आणि 13 वर्षीय संशयित मुलगा यांच्यात असा कसला वाद झाला होता ? अलोकला गळा आवळून मारण्यापर्यन्त कशी काय मजल गेली ? याचा शोध पोलिसांकडून केला जात आहे.