इंदौर : मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये एक धाडसी चोरी उघडकीस आली आहे. खजराना येथे काही चोरांनी कारच्या पाच शोरूमध्ये जाऊन मोठी चोरी केली. या चोरांनी शोरुममध्ये घुसून सोने आणि चांदीची नाणी आणि रोख रक्कम घेऊन फरार झाले. 12 लाखांसह मोठा ऐवज या चोरांनी लंपास केला. जेव्हा चोरी सुरू होती. तेव्हा या शोरुमचे सेक्युरिटी गार्ड लुडो खेळण्यात दंग होते. त्याचाच फायदा घेऊन या चोरांनी अत्यंत आरामशीर चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर झाली आहे. या चोरीमुळे एकच खळबळ उडाली असून आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे या चोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेतला जात आहे.
खजराना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धाडसी चोरी झाली. शनिवार आणि रविवारच्या रात्रीच्या दरम्यान चोरांनी शोरूम फोडले. पाच शोरूमच्या पाचही सेक्युरिटी गार्डला चकमा देऊन हे चोर आतमध्ये शिरले. त्यांनी आधी शोरूमचे शटर उघडले. त्यानंतर आत गेले आणि तिजोरीतून 12 लाखाची रोख रक्कम काढली. त्यानंतर दोन सोन्याची नाणी आणि एक चांदीचं नाणं घेऊन तिथून पळ काढला. पळ काढण्यापूर्वी या चोरांनी शोरूम पुन्हा जसं होतं तसंच लावून घेतलं. जणू काही घडलंच नाही, अशा पद्धतीने हे शोरूम बंद करण्यात आले होते. उशिराने चोरीचा प्रकार उघडकीस आला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
या शोरूमच्या सेक्युरिटीसाठी पाच सुरक्षा रक्षक तैनात होते. हे सर्व सुरक्षा रक्षक लूडो खेळण्यात व्यस्त होते. त्याचाच फायदा या चोरांनी घेतला. अन् लूडो खेळण्यात व्यस्त असल्यामुळे सुरक्षा रक्षकांनाही चोरी होत असल्याचा अंदाज आला नाही. काल सकाळी जेव्हा शोरूम उघडलं गेलं तेव्हा चोरी झाल्याचं उघडकीस आलं. सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर पाच चोरांनी ही लूट केल्याचं उघडकीस आलं आहे.
शोरूममध्ये चोरीची घटना घडली आहे. चोर 12 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन गेले आहेत. सीसीटीव्ही फुटजे आम्हाला मिळाले आहे. चोरांची ओळख पटवली जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारची चोरी कोण करू शकतात, अशा चोरांची यादी तयार केली जात आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून चोरांना लवकरात लवकर पकडले जाईल, असं खजराना पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश वर्मा यांनी सांगितलं.