नाशिकः नाशिकमध्ये चक्क विभागीय आयुक्तांच्या कडेकोट चोवीस तास बंदोबस्त असलेल्या सरकारी बंगल्यात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे. त्यांचा रुतबा काही औरच. त्यांच्या बंगल्यालाही चोवीस तास खडा पहारा असतो. आता याच बंगल्यात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोल आला आहे. गमे यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेले आहे. चोवीस तास कडेकोट बंदोबस्त असताना देखील चोरट्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आपले काम साध्य केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्या देखील बंगल्याचा आवारात चोऱ्या झाल्या आहेत. याबाबत सर्व गुन्हे दाखल असताना एकही चोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे यावेळी देखील चोर सापडतो की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
येवल्यात 7 ठिकाणी घरफोड्या
येवला शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, त्यांनी तब्बल 7 ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर येवला शहरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पटेल कॉलनी, आनंद नगर, मोरे वस्ती या कॉलनी भागात 7 ठिकाणी चोरी करत धुमाकूळ घातला आहे. यात 5 ठिकाणी बंद घरांच्या दरवाज्याचे कुलूप तोडत चोरी केली, तर परिसरातील राधाकृष्ण मंदिरातील दानपेटीतील रक्कम देखील चोरून नेली आहे. त्याचप्रमाणे आनंदनगर भागातील गणपती मंदिराची दानपेटी फोडत चोरट्यांनी त्यातील रक्कम देखील लंपास केली आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर चोरीच्या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले असून, पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीय करीत आहेत.
नाशिकचा तरुण बेपत्ता
नाशिकचा तरुण इगपुरीमधून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. निखिल नाना केदारे (वय 23) हा तरुण नाशिकमधल्या इंदिरानगर भागातील रथचक्र सोसायटीत आपल्या आई-वडिलांसह रहायचा. मात्र, निखिल 21 ऑक्टोबर रोजी इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील सिंधू नरवाडे या मित्राला भेटायला गेला. त्याची व त्या मित्राची भेट झाली. त्यानंतर तो कोणाला काहीही न सांगता निघून गेला. निखिलची आई मंगला नाना केदारे (वय 50) यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. निखिलची शरीरयष्टी सडपातळ आहे. त्याची उंची 5 फूट 5 इंच असून रंगाने गोरा, चेहरा गोल, नाक सरळ आहे.
फटाके फोडणारा मुलगा गंभीर जखमी
फटाके फोडणे एका सात वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतले असून, त्याच्यावर आता नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकच्या इंदिरानगर मधील पांडवनगरीत राहणाऱ्या शौर्य लाखोडे हा सात वर्षांचा मुलगा मित्रांसोबत फटाके फोडत होता. त्यांची रोजप्रमाणेच धमाल मस्ती सुरू होती. ते फटाके पेटवायचे आणि बाजूला फेकायचे. मोठा आवाज व्हायचा. त्यानंतर ही मित्रमंडळी टाळ्या वाजवायची. असा खेळ बराच वेळ रंगला. मात्र, अचानक एका मित्राने फटाका पेटवून बाजूला फेकला. तो नेमका शौर्यच्या अंगावर पडला. त्यामुळे त्याच्या कपड्यांनी पेट घेतला. सोबत फटाकाही वाजला. यामुळे शौर्य मोठ्या प्रमाणात भाजला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इतर बातम्याः
इलेक्शनचा धुरळा, नाशिक महापालिकेत 151 नगरसेवक होणार!
Skin Care Tips : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!https://t.co/zNFSf7M1HQ | #Skincaretips | #Beautifulskin | #Skincare | #Beautytips | #Skin | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 27, 2021