राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वांद्रे पूर्वचे उमदेवार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा धमकीचा फोन आला आहे. झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर हा धमकीचा फोन आला आहे. या महिन्यात 12 ऑक्टोंबरला दसऱ्याच्या दिवशी झिशान सिद्दीकी यांचे वडिल बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचे पुरावे समोर येत आहेत. ही लॉरेन्स बिश्नोई गँग मागच्या काही काळापासून सलमान खान याला धमकावत होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच ठोस कारण अजून समोर आलेलं नाही. पण बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे निकटवर्तीय होते, म्हणून त्यांना संपवण्यात आल्याच म्हटलं जातय.
शुक्रवारी सायंकाळी झिशान सिद्दीकी यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा धमकीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने झिशान सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे. याप्रकरणी झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गुरफान खान नावाच्या 20 वर्षाच्या तरुणाला नोएडामधून अटक करण्यात आली आहे. झिशान सिद्दीकी सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्यांनी मागच्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांना महायुतीने वांद्रे पूर्वमधून उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्वमधून शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांना हरवून निवडणूक जिंकली होती.
झिशान सिद्दीकी मागच्यावेळी कुठल्या पक्षाकडून लढलेले?
वांद्रे पूर्व हा मातोश्रीच्या परिसरातील विधानसभा मतदारसंघ आहे. महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात ठाकरे गटाने वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे. वरुण सरदेसाई हा आदित्य ठाकरेच्या मावशीचा मुलगा आहे. झिशान सिद्दीकी गेल्यावेळी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. पण काँग्रेसमध्ये ते नाखुश असल्याच काही महिन्यांपूर्वीच स्पष्ट झालं होतं. निधन होण्याआधी त्यांचे वडिल बाबा सिद्दीकी यांनी तीन दशकांची काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.