सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे, वाल्मिक कराडला अटक कधी होणार? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्याच बोललं जातय. संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यामागे वाल्मिक कराडच असल्याचा स्थानिक ग्रामस्थ आणि कुटुंबियांचा आरोप आहे. हा वाल्मिक कराड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंच पानही हलत नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. आता याच वाल्मिक कराडला अटक कधी होणार? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. वाल्मिक कराड पोलिसांना शरण येईल, अशी कालपासून चर्चा आहे. पण अजून तसं झालेलं नाही.
आता शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड संदर्भात मोठा दावा केला आहे. “आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे” असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. वाल्मिक कराड पुण्यात लपून बसला असण्याची शक्यता आहे. सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. सीआयडी आणि पुणे पोलिसांची पथक वाल्मिक कराडच्या मागावर आहेत. बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्याच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. वाल्मिक कराडवर खंडणीखोरीचे सुद्धा आरोप झाले आहेत.
आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर , एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 31, 2024
‘जो बूंद से गयी हो हौद से नही आती’
जिंतेद्र आव्हाड यांनी, आज वाल्मिक कराड स्वत: पोलिसांना शरण जाईल असा दावा केला आहे. वाल्मिक कराड स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होईल. पण, त्याला रंग मात्र शौर्याचा दिला जाईल. ‘मला या सरकारला एवढेच सांगायचे आहे, जो बूंद से गयी हो हौद से नही आती’ असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. “वाल्मिक कराडला 302 चा आरोपी का करत नाही? त्याला मोक्का कधी लावणार? याची उत्तरे मिळालेली नाहीत. न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार? याचे उत्तर मिळालेले नाही” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.