Crime News : बाजारात टोमॅटोचे भाव (tomato price hike) चढे आहेत, टोमॅटोच्या किमती काही कमी होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी टोमॅटोचे दर चार ते पाच पटीने वाढल्याचे दिसत आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यापासून गुन्ह्याच्या अनेक घटनाही वाढल्या आहेत. कोणाच्या शेतातून लाखोचे टोमॅटो गायब होतात तर काही लोकांना मारहाण करून त्यांच्याकडून टोमॅटो हिसकावले जातात. आता अशीच खळबळजनक घटना आंध्रप्रदेशमध्येही घडली आहे. तेथे एका टोमॅटो पिकवणाऱ्या शेतकऱ्याची (murder of tomato farmer) निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोमॅटो महागल्याने या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वीच बरेच टोमॅटो विकून जवळपास ३० लाख रुपये कमावले होते. याच पैशांच्या लोभातून त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
आंध्र प्रदेशच्या अन्नामय्या जिल्ह्यातील टोमॅटो पिकवणारे शेतकरी नरेम राजशेखर रेड्डी (62) यांची मदनपल्ले मंडल येथील बोडिमल्लादिने गावात हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री ते दूध विकण्यासाठी गावात जात असताना त्यांचा खून करण्यात आला असावा असा संशय पोलिसांना आहे. हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच रोखले, त्यांचे हात-पाय बांधले आणि टॉवेलने गला आवळून त्यांची हत्या केली.
पैशांवरून हत्या झाल्याच संशय
गावापासून दूर शेतात राहणारे नरेम रेड्डी हे दूध पोहोचवण्यासाठी गावात जात होते, असे सांगण्यात आले होते. काही अज्ञात लोक टोमॅटो खरेदीच्या बहाण्याने शेतात आले होते, अशी माहिती त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिली होती. मात्र पती गावात गेल्याचे सांगताच ते निघून गेले. या शेतकऱ्याने नुकतेच कृषी बाजारात टोमॅटो विकून 30 लाख रुपये कमावले होते, असे सांगितले जात आहे. त्याच पैशापायी ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. मृत शेतकरी नरेम यांच्याकडे काही पैसे होते की नाही याचा पोलिस अद्याप तपास करत आहेत.
या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हत्येचा उलगडा करण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली असून स्निफर डॉगही तैनात केले. ते स्निफर डॉग घटनास्थळावरून माग काढत मृत शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचले. 3 ते 4 जणांनी मिळून ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी व दोन विवाहीत मुली असा परिवार आहे.