तिरुअनंतपुरम : मोबाईलवरुन ऑनलाईन तासिका घेऊन झाल्यानंतर शिक्षिकेचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर 46 वर्षीय शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यांना डोळे भरुन पाहण्याची इच्छा व्यक्त केली. सर्वांना आपापले व्हिडीओ ऑन करण्यास सांगून शिक्षिकेने चिमुरड्यांना मन भरेस्तोवर पाहिलं. लेक्चर आटोपून झाल्यानंतर त्या घरातच कोसळल्या आणि काही मिनिटांतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उत्तर केरळातील कल्लार येथे ही घटना घडली.
नेमकं काय घडलं?
केरळातील अदोट्टुकाया येथील शासकीय कल्याण निम्न प्राथमिक शाळेतील शिक्षिका माधवी सी यांचा तिसऱ्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांचा गणिताचा वर्ग संपवल्यानंतर गुरुवारी रात्री मृत्यू झाला. त्यांच्या मोबाईलमधील ऑनलाइन क्लासचे रेकॉर्डिंग आता त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार, सहकारी आणि विद्यार्थ्यांसाठी वेदनादायक स्मृती ठरले आहे.
ऑनलाईन लेक्चरमध्येच तब्येत बिघडली
ऑनलाईन वर्ग सुरु असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसले. नंतर त्यांना ठसका लागला आणि खोकला येत होता. पुढील आठवड्यात शाळा पुन्हा सुरू होईल आणि तिला सर्व विद्यार्थ्यांना भेटायचे आहे, असेही त्या विद्यार्थ्यांना सांगत असल्याचे ऐकू येत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊन अचानक तास आटोपता घेतला. काही वेळाने घरात आलेल्या एका नातेवाईकाला ती बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेली दिसली.
हाय बीपीमुळे मृत्यूचा अंदाज
नातेवाईकांनी शिक्षिकेला जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले, कुटुंबीयांनी सांगितले की, उच्च रक्तदाब हे तिच्या आकस्मिक मृत्यूचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
संबंधित बातम्या :
नाकाबंदीत उडवाउडवीची उत्तरं, दरोडा टाकण्याच्या तयारीत नऊ जणांच्या टोळीला अटक
मैत्रिणी फिरवण्यासाठी 56 सोनसाखळ्या चोरी, नाशकात दोन उच्चशिक्षित तरुणांना अटक