डोंबिवली : सांस्कृतिक शहरात गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. लूट करण्यासाठी चोरटे नवनवीन फंडे अवलंबत आहेत. डोंबिवलीत अशीच एक उघडकीस आली आहे. अंधश्रद्धेचा फायदा घेत दोघा भामट्यांनी एका भररस्त्यात एका इसमाला लुटल्याची घटना घडली आहे. शंतनू रवींद्रनाथ मित्रा असे लुटण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भामट्यांनी या व्यक्तीकडील 90 हजाराचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी मित्रा याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
डोंबिवली पूर्वेला गडकरी रोडवर राहणारे शंतून मित्रा हे शनिवारी सकाळी शामराव विठ्ठल बँकेच्या एटीएममधून 5 हजार रुपये काढून चालले होते. फडके रोडने डोंबिवली स्टेशनकडे चालत जात असताना बाटा शोरुमजवळ त्यांना दोन अनोळखी इसम भेटले. या दोघांनी मित्रा यांना देवी-देवतांची माहिती देत बोलण्यात गुंतवले. यानंतर दोघा भामट्यांनी त्यांना 101 पावले चालून बाप्पाचा मंत्रजप करा तरच बरकत येईल, असा सल्ला दिला. तसेच त्यांच्याकडील पैसे आणि ऐवज बॅगेत काढून ठेवण्यास सांगितले.
भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत मित्रा यांनी शंतनू यांनी त्यांच्याकडील सोन्याची चेन, सोन्याची अंगठी, टायटन कंपनीचे घड्याळ, 5 हजारांची रोकड, बँकेची कागदपत्रे, एटीएम कार्ड बॅगेत ठेवले. यानंतर तुम्ही आता मत्र जंप सुरू करा आणि तुमच्या हातातील बॅग माझ्या मित्राकडे द्या आणि तुम्ही आता सरळ 101 पावले चालत जा, असे सांगितले. त्यानुसार शंतनू यांनी चालण्यास सुरूवात केली. थोडे अंतर पुढे जाऊन पाठीमागे वळून पाहिले असता ते दोन्ही अनोळखी इसम दिसेनासे झाले.
यानंतर आपली फसवणूक झाल्याचे मित्रा यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक आणि लूट झाल्याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शंतनू मित्रा यांच्या तक्रारीवरुन दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांची पथके सीसीटिव्ही फुटेजच्या साह्याने भामट्यांचा शोध घेत आहेत.