डोंबिवली : कार (Car)ला धक्का लागल्याने चिडलेल्या कार चालकाने साथीदारांसह टेम्पोमधील काका-पुतण्याला चाकूने वार करुन गंभीर जखमी (Injured) केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. हर्षद रसाळ आणि बंडू रसाळ अशी जखमींची नावे आहेत. दोघांवर गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात उपचार (Treatment) सुरु आहेत. पंडित म्हात्रे असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील सोनरपाडा परिसरात रविवारी रात्री धक्कादायक प्रकार घडला आहे.
मंडप डेकोरेशनचे सामान घेऊन टेम्पो चालक हर्षद रसाळ आणि त्याचे काका बंडू रसाळ हे डोंबिवली पुर्वेतून चालले होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका चारचाकी कारला त्यांच्या टेम्पोचा धक्का लागला.
याच कारणावरून कार चालक पंडित म्हात्रे आणि टेम्पो चालक हर्षद रसाळ यांच्यात वाद झाला. हा वाद बघून हर्षदचा काका बंडू रसाळ मध्यस्थी करण्यास गेला.
याच गोष्टीवरून कार चालक पंडित म्हात्रेला राग आला आणि त्याने फोन करून तीन लोकांना बोलावून घेतले. यानंतर हर्षद व त्याचा काका बंडू यांना बेदम मारहाण केली.
संतापलेला कार चालक इतक्यावरच थांबला नाही तर गाडीला धक्का दिला म्हणून दोघांवर चाकूने सपासप वार करत दोघांना गंभीर जखमी करुन पसार झाला. त्यानंतर नागरिकांनी दोन्ही जखमी काका पुतण्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
काका बंडू रसाळ यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी कार चालकासह इतर तीन जणांवर गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फरार कार चालकाचा शोध सुरू केला आहे.