भुवनेश्वर : क्रिकेटचा खेळ हा जंटलमन लोकांचा खेळ असल्याचं मानलं जातं. मैदानावर बॅट आणि गोलंदाजीतून प्रत्येक खेळाडू आपली हुकूमत गाजवत असतो. पण ओडिशात एक भलतीच घटना घडली आहे. ओडिशात क्रिकेटचं मैदान युद्धभूमी झाल्याचं समोर आलं आहे. अंपायनरे केवळ नो बॉल दिला म्हणून संतापलेल्या एका तरुणाने थेट मैदानातच अंपायरला भोसकले. त्यामुळे अंपायर रक्ताच्या थारोळ्यात पडला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच या अंपायरचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ओडिशाच्या महिसलांदा येथे ही घटना घडली. मृत तरूणाचं नाव लकी राउत असं आहे. तो 22 वर्षाचा आहे. महिसलांदा येथे टुर्नामेंट सुरू होती. ब्रह्मपूर आणि शंकरपूर या दोन संघात हे सामने सुरू होते. हे सामने पाहण्यासाठी शेकडो लोक आले होते. यावेळी अंपायर लकीने ब्रह्मपूर टीमच्या विरोधात एक चुकीचा निर्णय दिला. अंपायरने नो बॉल दिल्याने ब्रह्मपूर टीमचे क्रिकेटपटू संतापले. त्यामुळे वाद सुरू झाला. शाब्दिक चकमक झाली. लकीच्या या निर्णयाने जगा राउत हा तरुण अधिकच भडकला. त्याने अंपायर लकीसोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यामुळे वाद अधिकच वाढला.
त्यानंतर जगा राउतने त्याचा भाऊ मुन्ना ऊर्फ स्मृती रंजनलाही बोलावून घेतलं. स्मृतीने लकीशी वाद घालत त्याला खाली पाडून प्रचंड मारहाण केली. त्यानंतर स्मृती रंजन याने मैदानातच चाकू काढला. त्यानंतर त्याने अंपायर लकीवर एकामागोमाग एक हल्ले करण्यास सुरुवात केली. चाकूचे सपासप वार झाल्याने अंपायर लकी जखमी होऊन खाली कोसळला. त्यामुळे त्याला तात्काळ एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच उपचार सुरू असताना लकीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेची माहिीत मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे. तसेच गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार लकी या सामन्यावेळी अंपायरिंग करत होता. त्यांनी यावेळी नो बॉलि दिला. त्यानंतर या निर्णयावरून वाद झाला. हाणामारी झाली. त्यात लकीच्या छाती आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच मॅच खेळणाऱ्या आणि मॅच बघण्यासाठी आलेल्यांची कसून चौकशी केली जात आहे.