नवी दिल्ली पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सायबर क्राईम रॅकेटचा मास्टरमाइंड चीनमध्ये बसून भारतातील लोकांची लूट करत होता. या सायबर रॅकेटमधील एका भारतीय गुन्हेगाराच्या बँक खात्यात दोन दिवसांत 1.25 कोटी रुपये जमा झाले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांना तपासातून अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे. या प्रकरणात देव भाटी (36), रॉबिन सोलंकी (25), विष्णू सोलंकी (20) आणि आकाश कुमार जैन (31) यांना अटक झाली होती. अटक केलेल्या या आरोपींचे चीन कनेक्शन आले आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, एका व्यक्तीला धमकी देऊन त्याची 31.55 लाख रुपयांमध्ये फसवणूक झाली, अशी तक्रार 18 जुलै 2024 ऑनलाइन पद्धतीने आली. त्यातील व्यक्तीने तक्रारीत म्हटले की, 13 जुलै रोजी त्यांना फोन आला. त्या फोनमधील कॉलरने तक्रारदारास सांगितले की, तुमच्या नावाने जारी केलेले मोबाईल सिम अनेक गुन्ह्यांमध्ये वापरले गेले आहे. त्यासंदर्भात 17 एफआयआर नोंदवले गेले आहेत. म्हणजे 17 गुन्हेगारी प्रकरणांमध्ये मोबाईल फोनचे सिमकार्ड वापरले गेले. मनी लाँड्रिंग आणि मानवी तस्करी यासारख्या गुन्ह्यांसाठीसुद्धा हे सिमकार्ड वापरण्यात आला आहे, असे त्या कॉलरने म्हटले होते. आरोपींनी त्या व्यक्तीची 31.55 लाख रुपयांमध्ये फसवणूक केली.
दिल्ली पोलिसांनी या तक्रारीचा तपास सुरु केला. तपासादरम्यान ज्या बँक खात्यांमध्ये फसवणुकीचे पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते, त्यांचा तपशील मिळवण्यात आला. आरोपींना त्यासाठी विविध शहरांमध्ये चालू बँक खाती उघडली होती. या बँक खात्यांमध्ये अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. जमा झालेले पैसे तातडीने अन्य बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले होते. आरोपी देव भाटीला आधी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन आरोपी रॉबिन आणि विष्णू यांना अटक करण्यात आली. चौकशीत देव भाटी याच्या खात्यात केवळ दोन दिवसांत 1.25 कोटी रुपये जमा केले गेले होते.
सायबर रॅकेट प्रकरणात आकाश कुमार जैन मुख्य आरोपी आहे. तो सोशल मीडियाच्या एप्लिकेशनच्या माध्यमातून चीनमधील फसवणूक करणाऱ्या लोकांच्या संपर्कात होता. पोलिसांनी गुन्हेगारांकडून सात मोबाइल फोन, एक लॅपटॉप जप्त केला आहे. आरोपींनी 150 जास्त बँक खाती उघडली होती. त्यांच्या वापर ते फसवणुकीसाठी करत होते.