नवी दिल्ली : दिल्लीत दोन वर्षापूर्वी झालेल्या आत्महत्या प्रकरणावर मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. दोन वर्षापूर्वी हातार टॅटू असल्याने लखनऊमधील एका तरुणाने आत्महत्या केली होती. अभिषेक असं या तरुणाचे नाव आहे. अभिषेकच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना आता दिल्ली कोर्टात खटला दाखल केला आहे. अभिषेकने आत्महत्या केली नाही, तर त्याची हत्याच झाली आहे, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
2020मध्ये ही घटना घडली होती. लखनऊ येथे राहणारा अभिषेक आयपीएस अधिकारी बनण्यासाठी दिल्लीत आला होता. दिल्लीच्या राजिंदर नगर या पॉश एरियात त्याने भाड्याने घर घेतलं होतं. या ठिकाणी राहून तो अभ्यास करत होता. आपल्या रुमच्या भिंतीवर त्याने आयपीएस अधिकाऱ्यांचे फोटोही लावले होते. हे फोटो पाहून आपणही असेच आयपीएस अधिकारी होऊ असं स्वप्न तो उराशी बाळगून होता. त्याशिवाय त्याने कागदाच्या एका तुकड्यावर मला 2021मध्ये आयपीएस बनायचं आहे, असं लिहून ठेवलं होतं.
आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिषेक दिवस रात्र मेहनत करत होता. त्याच काळात म्हणजे 21 फेब्रुवारी 2021मध्ये त्याने त्याच्या हातावर आयपीएसचा टॅटूही बनवला होता. दुसऱ्या दिवशी त्याने त्याचा मित्र ललित मिश्रा याला हा टॅटू दाखवला. त्यावर, अरे तू हे काय केलेस? हातावर टॅटू गोंदवून घेणाऱ्यांना यूपीएससी पास झाल्यानंतरही आयपीएससाठी सिलेक्ट करत नाहीत, असं ललितने त्याला सांगितलं. त्या दिवशी अभिषेकचे त्याचे वडील ब्रजेश याांच्याशी फोनवरून बोलणं झालं होतं. तेव्हा अभिषेक टेन्शनमध्ये असल्याचं त्यांना जाणवलं.
त्यानंतर अभिषेकने टॅटू गोंदल्याने आयपीएसच्या निवडीवेळी काय आव्हाने येतात याची माहिती शोधण्यास सुरुवात केली. टॅटू हटवण्याची टेक्निकही त्याने शोधण्यास सुरुवात केली. टॅटू हटवण्याची शक्यता किती आहे आणि त्यासाठीचा येणारा खर्च किती आहे याची माहितीही त्याने गोळा करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी त्याने आपल्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी पोलिसांना कोणतीच सुसाईड नोट मिळाली नाही.
टॅटू बनवणाऱ्या कलाकार आणि स्किन तज्ज्ञांच्या मतानुसार, लेझर टेक्निकने टॅटू हटवला जाऊ शकतो आणि कायमचा मिटवलाही जाऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक इंचाला प्रत्येकी 30 हजार रुपये खर्च येतो. त्यानंतरही अभिषेकने फाशी घेऊन आत्महत्या केली. मात्र, ही केवळ आत्महत्या नसून यात काही तरी काळंबेरं वाटल्याने अभिषेकच्या कुटुंबीयांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. हत्येच्या षडयंत्राची शक्यता वर्तवली आहे.
अभिषेकच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात घराचा मालक आणि त्याच्यासोबत राहणाऱ्यांना आरोपी बनवलं आहे. पोलिसांना चौकशीत हत्येचा कोणताही पुरावा मिळाला नाही. आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांची पॉलिग्राफी टेस्टही करण्यात आली. मात्र, त्यातही काहीच आढळून आलं नाही. त्यामुळे क्लोजर रिपोर्ट करण्यात आली. अभिषेकने फेब्रुवारीच्या चौथ्या आठवड्यात टॅटू बनवण्यासाठी गुगलवर माहिती सर्च केली होती. त्याची माहितीही पोलिसांनी कोर्टाला दिली होती.