उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका तरूणाला हेडफोन लावणे इतके महागात पडले आहे की, त्याला त्याचा जीव गमवावा लागला. रेल्वे रूळ (Railway line) ओलांडत असताना त्याला ट्रेनची धडक बसली आणि तो गंभीर जखमी झाला. रक्ताने माखलेल्या तरुणाला आजूबाजूच्या लोकांनी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात (Hospital) पाठवले. मात्र, वाटेतच तरूणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी (Police) मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गांधी नगर येथील साळीग्रामचा 20 वर्षीय मुलगा अजय हा बाजारासाठी घरातून निघाला होता. कानात हेडफोन लावून तो रेल्वे रुळ ओलांडत होता. तेव्हा चित्रकूटला जाणाऱ्या ट्रेनच्या ड्रायव्हरला तो तरुण दिसल्याने त्या ड्रायव्हरने ट्रेनची स्पीड कमी करत जोर जोरात हॉर्न देखील वाजवले. मात्र कानात हेडफोन लावल्याने तरूणाला काहीच आवाज ऐकू आला नाही आणि इंजिनला धडकल्याने तो दूर उडून पडला आणि तो यामध्ये गंभीर जखमी झाला.
गंभीर जखमी झालेल्या तरूणाला नागरिकांनी लगेचच दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अजयला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, त्याचा रस्त्यामध्येच मृत्यू झाला. अजय हा दोन भावांमध्ये सर्वात लहान होता. या घटनेनंतर कुटुंब दुखात आहे.
याप्रकरणी पोलीस स्टेशनचे एसएचओ अनूप दुबे यांनी सांगितले की, एक तरुण कानाला हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडत असताना त्याला ट्रेनची धडक बसली. लोकांनी त्याला आवाजही दिला पण कानात हेडफोन असल्याने ऐकू येत नव्हते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पीएमसाठी पाठवण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे.