प्रेमात पडलेल्या दोन जीवांना कोणी दूर करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना तो माणूस शत्रू वाटतो. आपण कधीच एकत्र येऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर काही जोडपी टोकाचा निर्णय घेतात. त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. कारण त्यांनी एकत्र जगण्या-मरण्याच्या आणा-भाका घेतलेल्या असतात. असच एक धक्कादायक प्रकरण समोर आलय. एक प्रेमी युगुल कारमधून चालल होतं. पोलीस आपल्या मागे लागलेत हे समजल्यानंतर त्या दोघांनी गाडीतच विष प्राशन करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. हे जोडप लखनऊवरुन नोएडाच्या दिशेने चाललेलं. त्यांची गाडी आगरा येथे पोहोचलेली असताना दोघांनी विष प्राशन केलं. एक्सप्रेस वे वर गाडी थांबवून दोघे विष प्यायले. पोलीस त्यांच्याजवळ पोहोचले, तेव्हा दोघ बेशुद्ध पडलेले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं.
प्रियकरावर आगरा येथील CHC रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रेयसीची हालत गंभीर असल्याने तिला पुष्पांजली रुग्णालयात दाखल करण्यात आलय. दोघांच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. प्रियकराने सांगितलं की, त्याने पोलिसांच्या भीतीने विष प्राशन केलं. सध्या दोघांवर उपचार सुरु आहेत.
…आणि दोघांच अफेअर सुरु झालं
खंदौली पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. लखनऊच्या काकोरी येथे राहणाऱ्या युवकाला त्याच गावातील एक अल्पवयीन मुलीवर प्रेम झालं. दोघांच अफेअर सुरु होतं. दोघांच्या कुटुंबीयांना या बद्दल समजल्यानंतर त्यांनी विरोध केला. प्रेमी जोडप्याला लग्न करायच होतं. पण कुटुंबीय राजी नव्हते. म्हणून दोघे घरातून पळाले. लखनऊमधून ते कारने नोएडाच्या दिशेने निघाले होते.
प्रेमी जोडपं घाबरलं
याच दरम्यान दोघांच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुद्धा तात्काळ Action घेतली. पोलिसांच्या वाहनाने प्रेमी युगलाच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. जिल्हा पोलिसांना सुद्धा दोघांबद्दल माहिती देण्यात आली. प्रेमी युगलाला याची माहिती मिळताच दोघे घाबरले. पोलीस पकडतील या भीतीपोटी दोघांनी आगराच्या खंदौली येथे गाडी थांबवली व विष प्राशन केलं.