लखनौ : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये डॉक्टरवर गोळ्या झाडणाऱ्या दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर बाईकने जात असताना आरोपीने त्यांच्यावर गोळी झाडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सलमान आणि त्याचा साथीदार मेहबूब यांना अटक केली आहे. त्यांच्यावर 15 हजार रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. पीडित डॉक्टर बोगस असल्याचा आरोप केला जात आहे.
अटकेतील आरोपी सलमानने पोलिसांना सांगितले की, त्याच्या पत्नीवर डॉक्टर उपचार करत होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तेव्हापासूनच हे वैर सुरु झाले. संधी साधून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने डॉक्टरवर हल्ला केला. हे प्रकरण नांगल पोलीस ठाण्याच्या शेखुपुरा गावातील आहे. 30 डिसेंबर रोजी डॉक्टरांवर हल्ला झाला होता.
पोलिस अधीक्षक डॉ. धरमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर रोजी संध्याकाळी दोघा तरुणांनी नांगल पोलिस स्टेशनच्या शेखुपुरा गावातील फार्मासिस्ट डॉ. तिलक राम यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले, सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. पीडित डॉक्टरच्या भावाने कामराजपूर गावातील रहिवाशी सलमान आणि मेहबूब या दोन तरुणांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी सांगितले की, डॉक्टरांनी 2 महिन्यांपूर्वी सलमानची पत्नी शगुफ्तावर उपचार केले होते. उपचारादरम्यान शगुफ्ताचा मृत्यू झाला. तेव्हापासून सलमानने डॉक्टरसोबत खटके उडू लागले होते आणि तो त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. दोन्ही आरोपींवर 15-15 हजारांचे बक्षीस पोलिस अधीक्षकांनी जाहीर केले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींना काल सायंकाळी उशिरा अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, काडतुसे आणि घटनेत वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
अल्पवयीन मुलीला मिठी मारुन शाळेच्या पटांगणात चुंबन, मुरुडमध्ये टवाळखोराला अटक
दारुचे आमिष दाखवून केली विद्यार्थ्याची हत्या; गाझियाबादमधील धक्कादायक घटना