लखनौ : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरात असलेल्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये सोमवारी रात्री उशिरा एकट्या राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा पडला. आश्चर्यकारक म्हणजे निघताना सर्व लुटारुंनी त्या वृद्ध जोडप्याच्या पायाला स्पर्श केला आणि 500 रुपये दिले. तसेच, सहा महिन्यांत लुटलेली संपूर्ण रक्कम आणि दागिने परत करु, असं आश्वासन देखील त्यांनी दिलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
जोडप्याच्या मालकीचा होता कारखाना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र वर्मा आणि त्यांची पत्नी अरुणा वर्मा हे वृद्ध दाम्पत्य माजी महापौर आशु वर्मा यांच्या बंगल्याजवळ राजनगर सेक्टर 9 मध्ये राहतात. बुलंदशहर रोड औद्योगिक क्षेत्रात या जोडप्याचा कारखाना होता, मात्र कोरोना काळात त्यांना तो बंद करावा लागला होता. या जोडप्याला तीन विवाहित मुली आहेत. त्या तिघीही परदेशात राहतात.
‘त्या’ रात्री काय घडलं?
सोमवारी रात्री उशिरा 3.30 वाजताच्या सुमारास चार चोरांनी गॅस कटरने लोखंडी गेट कापले आणि नंतर काच फोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. जोडप्याच्या माहितीनुसार, एका बदमाशच्या हातात पिस्तूल होते, तर तिघा जणांकडे चाकू होते.
सहा महिन्यांत व्याजासह पैसे परत करण्याचं आश्वासन
दाम्पत्याला ओलीस घेऊन चोरट्यांनी दीड लाख रुपयांची रोकड आणि चार लाखांचे दागिने लुटले. दरोडेखोर निघण्यापूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या पाया पडले आणि त्यांनी दोघांची माफी मागितली. पुढील सहा महिन्यांत व्याजासह पैसे आणि दागिने परत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निघताना जोडप्याला 500 रुपयेही दिले. याची माहिती मिळताच कवीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले, गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.
पुण्याती हडपसरमध्ये बंगल्यात घरफोडी
दरम्यान, पुण्यातील हडपसरसारख्या गजबजलेल्या भागातील बंगल्यात घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली होती. यामध्ये 88 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे. विवेक वसंतराव चोरघडे यांचा शेवाळ वाडीत बंगला आहे. त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. 9 ऑगस्टला विवेक चोरघडे आपल्या कुटुंबीयांसह दक्षिण भारत फिरायला गेले होते. 19 ऑगस्टला ते पुण्यात परतले. तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. त्यात जवळपास 155 तोळे सोनं, 2 किलो चांदी, साडेसहा लाख रुपयांचे विदेशी चलन आणि 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
लोणावळ्यात डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा
दुसरीकडे, लोणवळ्यात वरिष्ठ डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा पडल्याचा धक्कादायक जून महिन्यात समोर आला होता. डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून हात-पाय बांधून सहा दरोडेखोरांनी चोरी केली होती. दरोडेखोर दोरखंडाने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यानंतर महिनाभराने पोलिसांनी मुंबईसह मध्य प्रदेशातून १५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या.
पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल राहतात. दरोडेखोरांनी खंडेलवाल दाम्पत्याच्या घरात प्रवेश करुन त्यांचे हात-पाय बांधले आणि सशस्त्र दरोडा टाकला होता. आरोपी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये काम करणारे मजूर असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्याकडून तीस लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.
संबंधित बातम्या :
दुकानासमोर भिकारी बनून रेकी, नंतर दरोडा, देशभरात धुमाकूळ माजवणारी टोळी नालासोपाऱ्यात जेरबंद
CCTV VIDEO | लोणवळ्यात डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा, दाम्पत्याला बांधून 66 लाखांची लूट