लखनौ : मेरठमध्ये लग्नाच्या मंडपात 19 वर्षीय तरुणीवर तिच्याच मावस भावाने बलात्काराचा प्रयत्न करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खुद्द आरोपीनेच खुनाची कबुली दिली आहे. हत्या प्रकरणातील आरोपी मावस भाऊ विशाल पिलखुवा याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुणीवर एकतर्फी प्रेम करायचा, मात्र त्याच्या हेतूबद्दल कदाचित मयत तरुणीलाही तोपर्यंत कल्पना नव्हती.
चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रतिकार केल्यामुळे तिची हत्या केली. मेरठचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात गड रोडवरील रेड कार्पेट पॅव्हेलियनमध्ये सोमवारी रात्री लग्न समारंभात नवरदेवाच्या भाचीचा खून झाला होता. अत्याचारानंतर तिची हत्या झाल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला होता. मृतदेह आढळला त्या खोलीत झोपलेल्या रवी नावाच्या एका हवालदारालाही पकडण्यात आले, ज्याला आरोपी समजून उपस्थितांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी हवालदार आणि मंडप संचालकांचीही चौकशी केली.
खोलीत तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न
मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी मुलीचा मावस भाऊ विशाल पिलखुवा याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशालने सांगितले की, तो रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास तरुणीला पॅव्हेलियनमधील एका खोलीत घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध केला असता विशालने तिचा गळा आवळून खून केला. घटनेनंतर तो मंडप सोडून गेला आणि दोन तासांनी परत आला. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार केल्याचा दावा त्याने केला.
खोलीत झोपलेल्या हवालदारामुळे गोंधळ
कॉन्स्टेबल रवी गुन्हा घडला त्याच खोलीत सापडला होता. रवीची चौकशी केली असता त्याने सांगितले की आपण मद्यधुंद अवस्थेत होतो, नंतर डान्स केला आणि खोलीत जाऊन झोपलो. त्यानंतर काय झाले, याची आपल्याला कल्पना नाही. रवी ज्या खोलीत झोपला होता त्याच खोलीत मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करून खून करण्यात आला होता.
पीडित तरुणी मदतीसाठी आरडाओरड करत राहिली, पण रवी झोपला होता. या प्रकरणात त्याचाही हात असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. सध्या पोलीस मंडप चालक आणि हवालदाराची चौकशी करत आहेत.
दिशाभूल करण्याचा आरोपीचा प्रयत्न
चौकशीत आरोपी मावस भाऊ विशालने खुनानंतर तरुणीचा मृतदेह बाथरूममध्ये बंद करून तेथून निघून गेल्याची कबुली दिली. यानंतर दोन तासांनी तो लग्न सोहळ्यात परतला होता. कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता आरोपीनेही त्यांच्यासोबत शोधाचं नाटक केलं होतं. मुलीचा शोध न लागल्याने तरुणीचा सख्खा भाऊ आणि आरोपी यांच्यात बाचाबाचीही झाली होती. पोलीस हत्येचा आरोपी विशालच्या मोबाईल कॉलचे डिटेल्स काढत आहेत.
आरोपी विशालला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला पॅव्हेलियनमध्ये नेऊन गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आणि तपास केला. आरोपी विशालला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
सासऱ्याचा तलवार हल्ला, सुनेचे दोन्ही हात कापले, डॉक्टरांनी 9 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा जोडले
बहिणीची आत्महत्या, भावाने पत्नीची हत्या करुन विष प्राशन केले; वाचा नेमकं असं काय घडलं?