लखनौ : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डीएम कार्यालयात स्थानिक संस्था लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ताण तणावाला कंटाळून मधु शुक्ला यांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर मधु यांच्या पतीने प्रशासनावर अनेक आरोप केले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शव विच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला.
काय आहे प्रकरण?
मधु शुक्ला यांच्या पतीने आरोप केला आहे की ती विभागीय चौकशीच्या संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी (डीएम) कडे गेली होती. जिथे डीएमने तिला नोकरीवरून काढून तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. याला कंटाळून आपल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा दावा पतीने केला आहे.
घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मयत मधु शुक्ला यांच्या नातेवाईकांच्या आरोपावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन टाळण्याचा प्रयत्न सुरू केला, असा दावा केला जात आहे.
विभागीय चौकशी दरम्यान निलंबनाची कारवाई
शस्त्रास्त्र विभागात काम करत असताना झालेल्या गैरव्यवहाराबाबत मधु शुक्ला यांची विभागीय चौकशी सुरू होती. या तपासात मधु शुक्ला यांनाही निलंबित करण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाच्या आदेशानुसार त्यांना नंतर सेवेत घेण्यात आले.
बडतर्फ करून तुरुंगात पाठवण्याची धमकी?
मधु शुक्ला यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की या चौकशीच्या संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी हरदोईचे जिल्हा दंडाधिकारी अविनाश कुमार यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेली होती. जिथे जिल्हाधिकाऱ्यांनी तिला बडतर्फ करून तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच मधु शुक्ला यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
संबंधित बातम्या :
लग्नमंडपात नवरदेवाची 19 वर्षीय भाची मृतावस्थेत, मावस भावाकडून बलात्काराच्या प्रयत्नानंतर खून
सासऱ्याचा तलवार हल्ला, सुनेचे दोन्ही हात कापले, डॉक्टरांनी 9 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा जोडले
बहिणीची आत्महत्या, भावाने पत्नीची हत्या करुन विष प्राशन केले; वाचा नेमकं असं काय घडलं?