एका बँक कर्मचाऱ्याला स्पा सेंटरमध्ये जाऊन मालिश करुन घेणं खूप महाग पडलय. तो मालिश करुन घेण्यासाठी या स्पा सेंटरमध्ये गेला होता. पण इथे आपल्यासोबत काय होणार? याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. मालिश करुन जसा तो घरी आला, त्याला एक फोन आला. स्पा सेंटरच्या संचालिकेचा हा फोन होता. समोरुन सांगितलं, “आम्ही तुमचा अश्लील व्हिडिओ बनवलाय. हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये, अशी तुमची इच्छा असेल, तर आम्ही सांगू ते ऐकावं लागेल” उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हे प्रकरण आहे.
समोरच्या महिलेच म्हणण ऐकून बँक कर्मचाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. लोक लज्जेस्तव गपचूपपणे जे सांगितलं, ते ऐकलं. स्पा संचालिकेने ब्लॅकमेल करुन त्याच्याकडून वसुली सुरु केली. तीन लाख रुपये त्याने दिले. त्यानंतरही ब्लॅकमेलिंगचा हा सिलसिला थांबला नाही. ती महिला, बँक कर्मचाऱ्याकडे आणखी पैसे मागत होती. अखेर कंटाळलेल्या त्या बँक कर्मचाऱ्याने पोलिसांची मदत घेतली.
कसा व्हिडिओ बनवला?
मी स्पा स्टेंरमध्ये मसाज करुन घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी कपडे चेंज करताना सिक्रेट कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवला. त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा सिलसिला सुरु झाला असं बँक कर्मचाऱ्याने सांगितलं. “मी त्या महिलेला तीन लाख रुपये दिले होते. मात्र, तरीही तिची पैशांची मागणी थांबत नव्हती. तिने पाच लाख रुपये मागितले होते” असं तो म्हणाला.
पोलिसांनी काय सांगितलं?
स्पा सेंटरची संचालिका फोनवरुन खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवण्याची, जीवे मारण्याची धमकी देत होती असं पीडित व्यक्तीने सांगितलं. SSP डॉ. विपिन ताडा म्हणाले की, “शहरात विना परवाना अनेक स्पा सेंटर सुरु आहेत. स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालवण्याचाही आरोप झालाय. प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तथ्याच्या आधारावर कारवाई केली जाईल”
किती लाखाची मागणी केली?
“मी त्यांच्या टॉर्चरने हैराण झालेलो. रोज मला धमक्या मिळत होत्या. माझ्याकडे पैसे उरले नव्हते, ते माझ्याकडून पाच लाख रुपयाची मागणी करत होते. माझे तीन लाख रुपये मला परत मिळवून देण्यासाठी पोलिसांनी माझी मदत करावी” असं बँक कर्मचाऱ्याने सांगितलं.