उत्तर प्रदेशातील बांदा येथे एक धक्कादायक (Shocking) घटना उघडकीस आलीयं. सरकारी शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याच्या घरात घुसून एका व्यक्तीने या महिलेवर अत्याचार करत लुटमार केलीयं. इतकेच नाही तर यामहिलेचे कपडे देखील फाडण्यात आले आहेत. महिलेने (Women) याला विरोध केला असता तिला लाथा-बुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली. यासोबतच महिलेचे दागिनेही चोरण्यात आले. महिलेने गोंधळ घालून ओरडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी महिलेचा जीव वाचवला. यावेळी या आरोपीने महिलेला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचे कळते आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पीडित महिलेने म्हटले होते की, 1 जुलै रोजी रात्री पैलाणी पोलिस स्टेशन हद्दीतील एका व्यक्तीने गेटचे लॅच तोडून घरात प्रवेश केला. त्याने महिलेचा विनयभंग केला, तिचे कपडे फाडले. कान व नाकातील दागिने चोरले. आरोपी दारूच्या नशेत होता, असे सांगितले जात आहे. पीडित महिलेने विरोध केला असता दारुड्याने लाथा-बुक्क्यांनी तिला मारले. महिलेने आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावले. यावेळी त्याव्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.
पीडित महिलाही सरकारी शाळेत काम करते. पीडित महिलेने गुन्हा दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बांदा शहराचे डेप्युटी एसपी राकेश कुमार सिंह यांनी सांगितले की, शहरातील कोतवाली परिसरात एका महिलेने एका पुरुषावर घरात घुसून मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तपास करून संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे.