विरारमध्ये हायप्रोफाईल कॉल सेंटरचा पर्दाफाश, परराज्यातील 49 आरोपींना अटक

| Updated on: Apr 11, 2023 | 1:50 PM

एका फार्महाऊसमध्ये बोगस कॉल सेंटर सुरु होते. परराज्यातील तरुण-तरुणी कॉल सेंटरद्वारे परदेशी नागरिकांची फसवणूक करत होते. राजोडी समुद्र किनाऱ्यावर राजरोसपणे हा धंदा सुरु होता.

विरारमध्ये हायप्रोफाईल कॉल सेंटरचा पर्दाफाश, परराज्यातील 49 आरोपींना अटक
विरारमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश
Image Credit source: TV9
Follow us on

विरार / विजय गायकवाड : विरारमध्ये अर्नाळा सागरी पोलिसांनी एका हायप्रोफाईल कॉल सेंटरचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत एकूण 49 तरुण-तरुणींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरोधात भादवी कलम 419, 420, 120 (ब), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43, 66, 66 (क), 66 (ड), 75 आणि भारतीय टेलिग्राम कायदा कलम 25 प्रमाणे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना आज वसई न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजोडी समुद्रकिनारी फार्म हाऊनसमध्ये सुरु होते कॉल सेंटर

राजोडीच्या समुद्रकिनारी असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये थाटलेल्या बोगस कॉल सेंटरवर अर्नाळा पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटर चालविणाऱ्या, त्यांना मदत करणाऱ्या जागा मालक अशा तब्बल 51 जणांवर गुन्हा दाखल करून 11 तरुणी व 39 तरुणांना अटक केली आहे. यातील मुख्य सूत्रधार नवीन भूपेंद्रकुमार भूताने अद्यापही फरार आहे.

हे सर्वजण दिल्ली, पंजाब, हरियाणा राज्यातील रहिवासी असून, उच्च शिक्षित आहेत. इंटरनेट कॉलच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियातील पे पाल बँकेच्या खातेदारकांच्या खात्यातील पैसे लुटण्याचे काम या बोगस कॉल सेंटरमधून केले जात होते. हे कॉल सेंटर मागील दीड महिन्यापासून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकला छापा

वसईच्या समुद्र किनाऱ्यावर राजोडी येथील OAC पेंट बुल अरेना रिसॉर्टमध्ये एक बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाली होती. रविवारी पहाटे पोलिसांनी या रिसॉर्टवर छापा मारला. यावेळी बोगस कॉल सेंटर सुरू असल्याचे आढळले. रविवार दिवसभर ही कारवाई सुरू होती.

या छाप्यात एकूण 49 तरुण-तरुणींना अटक केली आहे. आरोपींकडून 20 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस अधिक तपास करत आहेत.