बदलापूर येथे शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता विरारमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाजगी क्लासेस चालवणा-या शिक्षकाची विरारमध्ये पालकांनी चक्क अर्धनग्न धिंड काढली आहे. क्लासमधील 9 व्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील वर्तन करून, तिची छेड काढत असल्याचा पालकांचा आरोप आहे.
विनोद मोर्या असे धिंड काढलेल्या शिक्षकांचे नाव असून, तो विरार पूर्व कारगिल नगरमध्ये ईशान नावाने खाजगी क्लासेस चालवत होता. मागच्या आठवड्याभरापासून, वासनाध शिक्षक विद्यार्थीनीशी अश्लील वर्तन करीत होता. पीडित मुलगी घाबरून क्लासला जात नव्हती. ती क्लासला जायला टाळाटाळ करत होती. अखेर पालकांनी विचारणा केल्यावर सदर धक्कादायक प्रकार समोर आला.
शिक्षकाला जाब विचारला
विरार पूर्व कारगिल नगर, महाकाली मंदिराजवळ ईशान क्लासेसमध्ये हा प्रकार घडला आहे. आज संतप्त पालकांनी शिक्षकाला जाब विचारला. महिला-पुरुषांनी त्याला पकडून मारहाण केली. चक्क अर्धनग्न धिंड काढत विरार पोलीस ठाण्यात नेलं. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.