सध्या सगळ्या राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने या मुद्यावरुन राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे जोरदार प्रयत्न केले. कारण यात बीड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची नाव आली आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची गाडी अडवून आधी त्यांचं अपहरण केलं. त्यानंतर बेदम मारहाण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना थेट कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी आहे. आता धाराशिवचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत व केशव सावंत यांना अशाच प्रकराची जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
धनंजय सावंत हे भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत. धाराशिवचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत व केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. केशव सावंत व धनु सावंत तुमचा पण संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल, असं या पत्रात नमूद केलं आहे. त्या पत्रासोबत 100 रुपयांची नोट देखील जोडली आहे. पत्रातील मजकूर हा पेन्सिलने स्केच करून लिहिला आहे. धनंजय सावंत व केशव सावंत सोनारी, वाशी, ढोकरी येथील साखर कारखान्याचा कारभार सांभाळतात.
पवनचक्की माफियांचा हात आहे का ?
यापूर्वी परंडा तालुक्यातील सोनारी येथील धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडली होती. त्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेमागील सुत्रधाराचा अद्याप शोध लागलेला नाही. आता ह्या धमकीच्या पत्राने खळबळ उडाली आहे. सावंत बंधू कोणाच्या रडारावर आहेत, हा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. सावंत बंधुंना जी धमकी मिळालीय, त्यामागे पवनचक्की माफियांचा हात आहे का ? अशी देखील चर्चा सुरु झालीय.
तानाजी सावंत यांच्या नाराजीची चर्चा
तानाजी सावंत हे महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. 2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीच सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही. त्यांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. लॉबिंग केलं. पण एकनाथ शिंदेंनी त्यांना पुन्हा संधी दिली नाही. त्यामुळे सध्या तानाजी सावंत यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे.