दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी हे हत्यार सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये तपासासाठी पाठवले आहे. याशिवाय आफताबने आपल्या दुसऱ्या गर्लफ्रेंडला दिलेली श्रद्धाची अंगठीही जप्त केली आहे. आफताबची ही दुसरी गर्लफ्रेंड पेशाने मानसोपचार तज्ज्ञ आहे. श्रद्धा हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलीस हे हत्यार मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र हे हत्यार हाती लागत नव्हते. जवळपास महिनाभराच्या तपासानंतर हे हत्यार पोलिसांच्या हाती लागले आहे.
श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे 35 तुकडे करत विविध ठिकाणी फेकले. हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. मात्र पोलीस चौकशीत आफताब वारंवार आपले वक्तव्य बदलत होता.
हत्याकांडाचे सत्य जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आफताबच्या नार्को आणि पॉलिग्राफी टेस्टची परवानगी मागितली. परवानगी मिळताच आफताबच्या नार्को टेस्टची प्रक्रिया सुरु करण्यात आली. नार्को टेस्ट दरम्यान पोलिसांना महत्वपूर्ण पुरावे मिळाले.
आफताबची यापूर्वीच पॉलीग्राफ चाचणीची तीन सत्रे पार केली आहेत. पॉलीग्राफ चाचणीला लाय डिटेक्टर चाचणी असेही म्हणतात. पॉलीग्राफ चाचणीमध्ये, रक्तदाब, नाडी आणि श्वासोच्छवासाचा वेग यासारख्या शारीरिक क्रियाकलापांची नोंद केली जाते आणि ती व्यक्ती सत्य बोलत आहे की नाही हे शोधण्यासाठी या डेटाचा वापर केला जातो.
श्रद्धा हत्याकांड प्रकरणी 12 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी आफताबला अटक केली होती. त्यानंतर आफताबला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. 17 नोव्हेंबर रोजी त्याच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली होती.
मंगळवारी त्याला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शनिवारी दिल्ली न्यायालयाने आफताबला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.